म. टा. प्रतिनिधी, बारामतीः रेमडेसिविरचा काळाबाजार सुरु असताना दुसरीकडे या इंजेक्शनच्या रिकाम्या बाटलीत लिक्विड भरून ते इंजेक्शन म्हणून अव्वाच्या सव्वा दराला विकण्याचा लाजिरवाणा प्रकार बारामतीत उघडकीस आला आहे. बारामती तालुका पोलिसांच्या सतर्कतेमुळे बनावट रेमडेसीव्हर विकणाऱ्या टोळीला ताब्यात घेण्यात आलं आहे. यासंबंधी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.चौघेजण या टोळीत सहभागी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

बारामतीत सर्वत्र रेमडेसिविरचा तुटवडा निर्माण झाला आहे. या काळात रुग्णसेवेसाठी अनेकजण पुढाकार घेऊन काम करत असताना एकीकडे दुसरीकडे करोना संकटही वाढत आहे. या दरम्यान, प्रशासन नेमके काय करत होते?, असा सवालही आता उपस्थित होत आहे.

बारामतीतील एका रुग्णाच्या नातेवाईकाला रेमडेसिविरची गरज असल्याने त्याने या टोळीतील एका सदस्याशी संपर्क साधला. तो एका कोविड हेल्थ सेंटरमध्ये काम करतो. त्याच्याकडे इंजेक्शन असल्याची माहिती गरजूला मिळाली होती. त्यानुसार इंजेक्शन देणाऱ्यानं त्याला शहरातील फलटण चौकात येण्यास सांगितले. एका इंजेक्शनचे ३५ हजार असे दोन इंजेक्शनचे ७० हजार द्यावे लागतील, अशी मागणी केली.

सुदैवानं पोलिसांना ही घटना समजल्यानंतर त्यांनी वाहनांसह या टोळीतील काहींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून धक्कादायक माहिती मिळाली आहे. सेंटरमधील रिकाम्या झालेल्या रेमडिसिविरच्या बाटल्यांमध्ये लिक्विड भरुन ती बाटली व्यवस्थित पॅक करत हे बनावट औषध तयार करून ते विकले जात होते. या बनावट औषधांमुळं रुग्णांच्या जीवाशी खेळ केला जात होता. दरम्यान, या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाकडून तक्रार घेत तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here