मुंबईः देशात करोना संसर्गाचा कहर सुरु असतानाच करोना सुरक्षेच्या सर्व नियमांना तिलांजली देत लाखो भाविक आणि साधुंनी हरिद्वार येथे घाटावर गंगा स्नान गेले. कुंभमेळ्यात शाही स्नानासाठी गेलेले हजारो भाविक करोनाबाधित झाल्याचं समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

राज्यासह मुंबईतही करोनाचा संसर्ग वाढत आहे. अनेक रुग्णालयात ऑक्सिजनचा साठाही अपुरा असल्याचं चित्र आहे. तर, करोनावरील उपायांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. वाढती रुग्णसंख्या व इतर अडचणी यामुळं आरोग्य प्रशासनावर ताण पडत आहे. अशातच कुंभमेळ्यातून भाविक मुंबईत परतल्यावर करोनाचा स्फोट होण्याची शक्यता आहे. त्यामुळं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याची माहिती दिली आहे.

‘कुंभमेळ्याहून परतणाऱ्या भाविक ‘प्रसाद’ म्हणून करोना घेऊन येवू शकतात. त्यामुळं या भाविकांनी आपापल्या राज्यात स्वखर्चानं क्वारंटाईन व्हावं. मुंबईतही जे भाविक परतणार आहेत त्यांनाही क्वारंटाइन करण्याचा विचार आम्ही करत आहोत,’ असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

‘९५ टक्के मुंबईकर हे करोना नियमांचे पालन करत आहेत. तर, उर्वरित ५ टक्के लोक नियमांचे उल्लंघन करतात. या लोकांमुळं इतर लोकांनाही त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळं सध्याची परिस्थिती पाहता संपूर्ण लॉकडाऊन हाच प्रभावी उपाय ठरु शकतो,’ असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here