रवी राऊत ।

एक, दोन नव्हे तर तब्बल १५ नील गायींचा कळप एकाच वेळी इंद्रठाणा शिवारातील एका कठडे नसलेल्या विहिरीत रात्रीच्या दरम्यान पडला. सदर नीलगायींना सुखरूप बाहेर काढण्यासाठी वनविभागाने शर्तीचे प्रयत्न केले. तब्बल पाच तासांच्या प्रयत्नांनंतर सर्व नील गायींना सुखरूप बाहेर काढण्यात वनविभागाला अखेर यश आले आहे. (Forest Department Saves Life of 15 Bulebuck)

तालुक्यातील इंद्रठाणा शिवारात वनक्षेत्रालगत मोहन किसन राठोड यांचे शेत आहे. या शेतात त्यांनी तीस फूट खोलीची विहीर खोदली आहे. आर्थिक स्थिती बिकट असल्याने ते विहिरीचे बांधकाम करू शकले नाहीत. निलगायींचा एक कळप रात्रीच्या अंधारात या शेतातून जात होता. संरक्षक कठडा नसलेल्या या विहिरीत कळपातील एकामागोमाग एक गाय पडली. ही घटना शेतकऱ्याला समजताच त्यानं वनविभागाला या घटनेची माहिती दिली.

वाचा:

घटनेची माहिती व गांभीर्य लक्षात घेऊन नेर वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद कोहळे यांच्या नेतृत्वाखाली वन कर्मचाऱ्यांनी रेस्क्यू ऑपरेशन राबविले. एकाच वेळी तब्बल पंधरा नील गायींना बाहेर काढणे हे कठीण काम होते. या विहिरीत तब्बल दहा ते बारा फूट पाणी आहे. विहिरीला कुठलेही कठडे किंवा आधार घेण्यासाठी काहीही नसताना या सर्व प्राण्यांना सुखरूप बाहेर काढण्याचे आव्हान होते. नेर वनविभागाने हे आव्हान अत्यंत काळजीपूर्वक पेलले. दोरखंडाची जाळी करत त्या जाळीमध्ये एका एका नीलगायीला अडकवून जेसीबीच्या मदतीने वर काढण्यात आले. हे संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन तब्बल पाच तास चालले.

वाचा:

वनविभागाने वेळीच रेस्क्यू ऑपरेशन राबविल्याने वन्य जीवांचे प्राण वाचले. कर्मचाऱ्यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या रेस्क्यू ऑपरेशनध्ये मालखेडचे क्षेत्र सहाय्यक आर एम लडी, नेरचे क्षेत्र सहाय्यक विलास वाघमारे, जळगावच्या वनरक्षक सविता भडके, पी पी खत्री, प्रमोद तावडे, विलास देशमुख, अशोक कदम, अशोक आठवले यांनी सहभाग नोंदवला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here