अमरावती: अमरावतीतील रवीनगर परिसरात एका घरात आयपीएलवर सट्टा लावला जात होता. राजापेठ पोलिसांनी शुक्रवारी रात्री छापा मारून दोन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून १ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोन आरोपी फरार आहेत.

जिल्ह्यात आयपीएलवर सट्टा खेळला जात होता. सट्टेबाज हे सट्टा लावणाऱ्यांकडून मोबाइल कॉलवरूनच नोंदी घेत होते. याबाबत पोलिसांना खबऱ्यांकडून माहिती मिळाली. त्यानुसार राजापेठ पोलिसांनी रवीनगर परिसरातील एका घरात छापा मारला.

मिळालेल्या माहितीनुसार, राजापेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी मनीष ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय कृष्णा मापारी यांच्या पथकाने रवी नगरातील संदीप भुयारकर याच्या घरावर शुक्रवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास छापा मारला. यावेळी ऑनलाइन पद्धतीने सट्टा लावण्यात येत असल्याची माहिती उघड झाली. पोलिसांनी संदीप विनायक भुयारकर (४२, रवीनगर) आणि धीरज सुरेश भगत (३६, विलासनगर) यांना अटक केली.

पोलिसांनी घटनास्थळावरून तीन मोबाइल, एक टीव्ही, नोंदी ठेवण्यासाठी वापरलेल्या डायऱ्या, तसेच १ लाख ५१ हजार रोख असा एकूण १ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. अटक केलेल्या दोन्ही सट्टेबाजांना शनिवारी न्यायालयात हजर केले. त्यांना २० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. मनीष ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय कृष्णा मापारी, राहुल ढेंगेकर व विजय राऊत, दुल्ला राम देवकर, अतुल संभे, दानीश शेख, अमोल खंडेझोड यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी संदीप भुयारकरसह तेथे उपस्थित धीरज भगत या दोघांना अटक करून, मुद्देमाल जप्त केला. त्यांच्या चौकशीनंतर या सट्ट्यात आणखी दोघांचा सहभाग असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी रवी नगरातच संशयिताच्या घरावर छापा मारला. मात्र, ते हाती लागले नाहीत. आरोपी लॅपटॉप व मोबाइल घेऊन पसार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here