वॉशिंग्टन: अमेरिकेने इराणच्या कुद्‌स फौजांचे प्रमुख जनरल कासीम सुलेमानी आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांना इराकमध्ये ठार केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने अमेरिकेच्या लष्करी हवाई तळावर केलेल्या हल्ल्यात अमेरिकेचे १०० हून अधिक सैनिक जखमी झाले असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

याआधी हल्ल्यानंतर इराणने अमेरिकेचे ८० ‘दहशतवादी’ ठार केल्याचा दावा केला होता. तर, अमेरिकेने हा दावा फेटाळून लावताना जीवितहानीचे वृत्त फेटाळून लावत सैनिकांना दुखापत झाली नसल्याचे म्हटले होते. आता एक महिनाभरानंतर अमेरिकेने १०० हून अधिक सैनिक जखमी झाले असल्याचे मान्य केले आहे. पेंटागॉनने दिलेल्या माहितीनुसार, १०९ जखमी सैनिकांपैकी ७९ सैनिक पुन्हा एकदा लष्करी सेवेत रुजू झाले आहेत. या सैनिकांच्या मेंदूला दुखापत झाल्याचे निदान झाले होते. जखमी सैनिकांना चक्कर येणे, डोके दुखी, अंधुक दिसणे आदी समस्या भेडसावत होत्या.

डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे जखमी अमेरिकन सैनिकांवर उपचार सुरू असल्याची माहिती चीफ ऑफ स्टाफचे अध्यक्ष जनरल मार्क मिले यांनी जानेवारी महिन्यात दिली होती. इराणने हल्ला केलेल्या क्षेत्रात सुमारे २०० अमेरिकन सैनिक होते.

अमेरिकेने बगदाद येथील विमानतळाबाहेर केलेल्या हवाई हल्ल्यात इराणच्या कुद्‌स फौजांचे प्रमुख जनरल कासीम सुलेमानी आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्याचा बदला घेण्यासाठी इराणने इराकमधील अमेरिकी लष्कराच्या तळावर मोठा हल्ला चढवला. किमान १२ क्षेपणास्त्रे इराकमधील अमेरिकी लष्कराच्या ताब्यातील अल असद हवाईतळावर डागण्यात आली होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here