: श्वास घेण्यास त्रास होत असतानाही करोनाबाधित रुग्ण दाखल झाल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनापासून लपवल्याप्रकरणी सोलापुरात खासगी रुग्णालयांतील दोन डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करोनाचा वाढलेला मृत्यूदर ही चिंतेची बाब झाली आहे. त्यामुळे सोलापूर महापालिकेकडून शहरात मृत्यू होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मृत्यूचे कारण जाणून घेतले जाते. त्याचाच एक भाग म्हणून पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी स्वतः एका मृत व्यक्तीच्या घरी जाऊन त्या व्यक्तीचा मृत्यू कशामुळे झाला किंवा त्यांना कोणता गंभीर आजार होता का, याची माहिती घेतली. त्यांना संशय आल्याने स्वतः मृत व्यक्तीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या क्लिनिकला भेट दिली. विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी सोलापूर शहरातील डॉक्टरांसाठी निर्गमित केलेल्या आदेशाचे पालन झाले नसल्याचे स्पष्ट झाले.

विजापूर रोडवरील शांती नगर येथे राहणारे ८४ वर्षीय रुग्ण १२ एप्रिल रोजी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने क्लिनिकमध्ये दाखल झाले. तेव्हा डॉ. युवराज माने यांच्या समक्ष जाऊन उपचार घेतले. डॉ. युवराज माने यांनी रुग्णाची चाचणी केली नाही. तसेच रुग्णाची माहिती महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रास दिली नाही. दरम्यान या रुग्णाचा श्वसनाचा त्रास वाढला. तो शहरातील इएसआय हॉस्पिटलमधील कोविड वार्डात दाखल झाले. मात्र त्याच दिवशी सकाळी त्या रुग्णाचे निधन झाले. ही माहिती डॉ. पी. आर. नंदीमठ यांनी पालिकेच्या आरोग्य विभागाला दिली असता, मृताचे शवविच्छेदन करण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यूपश्चात कोविड चाचणी केली. त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे निर्मल क्लिनिकचे डॉ. युवराज माने (वय ४४ रा. नवीन आरटीओ जवळ विजापूर रोड, सोलापूर ) यांनी उपचारावेळी हलगर्जीपणा केल्याचे स्पष्ट झाले. सोलापूरचे पालिका आयुक्त तथा विशेष प्राधिकृत कार्यकारी दंडाधिकारी यांच्या निर्गमित केलेल्या वरील आदेशाचे उल्लंघन केले म्हणून त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच अक्कलकोट रोडवरील डॉ. जी. बी. विश्वासे यांच्या नित्यानंद रुग्णालयातही भेट दिली. तेथील दैनंदिन नोंदी तपासल्या असता, त्यातही अनियमितता आढळून आली. त्यांच्याकडील रुग्णांची योग्य माहिती दिली गेली नाही. सौम्य लक्षणे असलेल्या व मध्यम लक्षणे असलेल्या व्यक्तींची करोना तपासणी करण्याकरिता आरोग्य केंद्राकडे माहिती देत नसल्याने त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here