जयंत सोनोने/ अमरावती

मागील वर्ष खरीप हंगामात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले गेले होते. उगवण क्षमता नसलेल्या बियाण्यांची पेरणी केल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. यंदा दुबार पेरणी टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी घरगुती सोयाबीनवर प्रक्रिया करुन व त्यांची उगवण क्षमता तपासुन पेरणीसाठी घरगुती बियाण्यांना प्राधान्य देण्याचे, जिल्हा कृषी अधिक्षक अधिकाऱ्यांनी असं आवाहन केले आले आहे.

सोयाबीन हे स्वपराग सिंचित पिक असून त्यामध्ये कोणतेही संकरीत वाण विकसित झालेले नसल्याने या पिकांचे बियाणे दरवर्षी बाजारातून विकत घेऊन वापरण्याची अजिबात आवश्यकता नाही. बाजारातून खरेदी केलेल्या प्रमाणित बियाणेपासून तयार झालेले उत्पादन पुढे २ वर्षापर्यंत वापरता येते. त्यामुळे जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांकडे चांगल्या सोयाबीनचा साठा आहे त्यांनी त्यातील प्रत्येक पोत्यातून मुठभर धान्य घेऊन त्यातून सरसकट १०० दाणे वेगळे करुन गोणपाटाच्या तुकड्यावर १०-१९च्या रांगेत लावून त्यावर दुसऱ्या गोणपाटाचा तुकडा अंथरून चांगले पाणी मारुन गुंडाळी करुन सावलीत ठेवावा. दररोज पाणी मारुन बियाणे ओले ठेवावे. ७-८ दिवसात दाण्यांना चांगले कोंब येतील. गुंडाळी उघडून १०० दाण्यांपैकी चांगले निरोगी कोंब आलेल्या दाण्यांची संख्या मोजावी. ती ७० किंवा त्यापेक्षा जास्त आल्यास आपल्या सोयाबीनची उगवण शक्ती प्रमाणीत बियाण्याप्रमाणे आहे हे समजावे व ते शिफारशीप्रमाणे पेरणीसाठी वापरावे. जर उगवण ७० पेक्षा कमी येत असेल तर त्या प्रमाणात पेरणीसाठी बियाण्याची एकेरी मात्रा वाढवून पेरणी करावी असा, मोलाचा सल्ला जिल्हा कृषी अधिक्षक अधिकाऱ्यांनी केली आहे.

सोयाबीन पिकाची पेरणी करताना ४ ओळीनंतर एक ओळ रिकामी सोडून या ओळीत डवऱ्याच्या जानोळ्यांना दोरी गुंडाळून सरी पाडावी जेणेकरुन मुलस्थानी जलसंधारणाबरोबरच सोयाबीन पिकातील पिक संरक्षाणाची कामे योग्य रितीने करता येईल व कमी बियाणे वापरुन सुध्दा चांगले उत्पादन घेता येईल. याप्रमाणे बिबिएफ यंत्राव्दारे गादी वाफ्यावर पेरणी करणे, सरी वरंब्यावर टोकण पध्दतीने पेरणी करणे, पटा पध्दतीने पेरणी करणे याव्दारे सुध्दा एकरी सोयाबीनचे १० ते १२ किलो बियाणे कमी करता येऊ शकते. तसेच सोयाबीनमध्ये तुरीचे आंतरपिक घेतांना ८-९ ओळीनंतर तूर लावण्यापेक्षा ४-५ ओळीनंतर तुरीची ओळ पेरल्यास सोयाबीन व तुरीचे उत्पन्न सुध्दा चांगले घेता येऊ शकते व त्याद्वारे सुध्दा सोयाबीनच्या बियाणांची बचत करता येऊ शकते.

सोयाबीन व इतर पिक पेरणीपूर्वी बियाणेला रासायनिक किंवा जैविक बुरशी नाशक व जिवाणु संघाची प्रक्रिया करुनच पेरणी करावी. १०० मी.मी. पाऊस झाल्यानंतर पेरणी करावी. सोयाबीन पेरणी ३-४ से. मी. पेक्षा जास्त खोलीवर केली जाणार नाही याची दक्षता घ्यावी. उडीद, तुर, सोयाबीन, मुग या शगवर्गिय पिकांमध्ये युरीयाचा वापर अत्यंत मर्यादित करावा तसेच इतर पिकांमध्ये सुध्दा फुलोरा येण्याच्या कालावधीनंतर युरीयाचा वापर पुर्णत: टाळावा. महागड्या किटकनाशकांवर खर्च करण्यापेक्षा निंबोळ्या गोळा करुन त्याचा किड संरक्षणासाठी वापर करावा. व शेतीमध्ये होणाऱ्या अनावश्यक खर्चात कपात करुन शाश्वत उत्पन्नाचा मार्ग अवलंबावा, असे आवाहन अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here