म. टा. प्रतिनिधी, नगर: पुण्यातील बारामतीत रेमडेसिव्हिरच्या बाटलीत पॅरासिटामॉल भरून विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर आता श्रीरामपूरमध्ये रेमडेसिव्हिरच्या रिकाम्या बाटलीत सलाइनचे पाणी भरून विक्री करत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. डॉक्टरांनी कचऱ्याच्या डब्यात फेकलेल्या इंजेक्शनच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये सिरिंजने सलाइनमधील पाणी भरून त्याची विक्री करणात येत होती. या प्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली.

अटक केलेल्या आरोपीला स्थानिक न्यायालयात हजर केले. त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या रुग्णांचे नातेवाइक रेमडेसिव्हिर मिळवण्यासाठी धडपडत आहेत. त्याचा गैरफायदा घेत काही जण पैसा कमावतात. श्रीरामपुरातील एका रुग्णला तातडीने रेमडेसिव्हिरची आवश्यकता होती. त्याच्या नातेवाइकाला रईस अब्दुल शेख (वय २०, रा. मातापुर, ता. ) याने संपर्क करून रेमडेसीव्हिर देतो, असे सांगितले. डॉक्टरांची चिठ्ठी नसताना २५ हजार रुपयांना इंजेक्शन देत आल्याने नातेवाइकाला संशय आला. त्याने ही माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला.

रईस शेख याला श्रीरामपूर येथील हरेगाव फाट्याजवळील उड्डाण पुलाजवळ पकडले. त्याच्याकडून बनावट रेमडेसीव्हिर इंजेक्शन जप्त केले. पोलिसांनी शेखकडे अधिक चौकशी केली असता, त्याने धक्कादायक कबुली दिली. डॉक्टरांनी कचऱ्याच्या डब्यात फेकून दिलेल्या रिकाम्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनमध्ये सलाइनचे पाणी भरून विकायचो, असे त्याने सांगितले. या प्रकरणी भगत उर्फ भक्ती भागवत काळे याने दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली. रईस याने असे किती बनावट इंजेक्शन रुग्णांच्या नातेवाइकांना विकले? यामुळे कोणते रुग्ण दगावले का? याचा तपास श्रीरामपूर पोलीस करत आहेत. फौजदार समाधान सुरवडे व त्यांच्या पथकातील पोलीस नाईक दुधाडे, पोलीस शिपाई किरण पवार, वांढेकर, अर्जुन पोकळे यांनी ही कारवाई केली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here