मुंबई: वृत्तपत्र छायाचित्रकार आशीष राजे यांना झालेल्या मारहाण प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम बोरसे यांना निलंबित करण्यात आले आहे तर उपनिरीक्षक अझीम शेख यांचा प्रोबेशन कार्यकाळ वाढवण्यात आला आहे.

आशीष राजे यांना झालेल्या मारहाण प्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विविध पत्रकार संघटनांकडून करण्यात येत होती. या घटनेचा निषेध करण्यासाठी निदर्शनेही करण्यात आली होती. आज याबाबत पत्रकार संघटनांच्या प्रतिनिधींनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली व तातडीने कारवाईची मागणी केली. त्यानंतर दोन्ही अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

दरम्यान, बोरसे व शेख यांची शनिवारी तडकाफडकी बदली करण्यात आली होती. त्यांची मध्य विभागातील नियंत्रण कक्षात पाठवणी करण्यात आली होती. त्याचवेळी त्यांच्यावर आणखी कठोर कारवाई केली जाईल, असे संकेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आले होते.

नेमकं काय घडलं होतं?

नागपाडा येथे नागरिकत्व कायदा व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीविरुद्ध महिलांचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे छायाचित्रण करत असतानाच आशीष राजे यांना पोलिसांनी मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संबंधित पोलिसांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. विविध पत्रकार तसेच वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या संघटनांनी या घटनेचा निषेध केला होता. त्याचबरोबर रविवारी झालेल्या महाराष्ट्र पोलीस आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनवरही छायाचित्रकारांनी बहिष्कार टाकला होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here