किराणा दुकानांच्या वेळा सकाळी ७ ते ११ दरम्यानच निश्चित केल्याबद्दल व्यापाऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे. यातून करोना नियंत्रणात येणार नाहीच, उलट एरव्ही १२ तासांत विभागली जाणारी गर्दी चार तासांत होऊन करोनासंसर्ग वाढण्याची भीती आहे, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
अखिल भारतीय व्यापारी महासंघाचे (कॅट) मुंबई महानगर अध्यक्ष शंकरभाई ठक्कर यांनी सांगितले, ‘सध्या किराणा दुकाने सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत सुरू असतात. यादरम्यान एखाद्या दुकानात सरासरी १०० ग्राहक येत असल्यास आता ते तीन-चार तासांतच तेथे गर्दी करतील. कमी वेळेत अधिक गर्दी होऊन करोनाची साखळी तोडणे साध्य होणार नाहीच. यामुळे सरकारने असे अर्धवट निर्बंध आणण्यापेक्षा कडक लॉकडाउन लावावा.’
वाचा:
महाराष्ट्र उद्योग व व्यापारी चेंबरनेदेखील (केमिट) सध्याच्या निर्बंधात बदल करण्याची मागणी केली आहे. सध्याचे निर्बंध कायम ठेवायचे असल्यास वीज शुल्कात सवलतीची गरज आहे. एखाद्या कार्यालय किंवा दुकानातील कर्मचारी करोना संक्रमित झाल्यास त्याचा भार मालकावर येण्याऐवजी त्या कर्मचाऱ्याचे उपचार ईएसआयसीच्या माध्यमातून व्हायला हवे. याखेरीज करोना संकट सरेपर्यंत मालमत्ता करात सवलत तसेच कर्मचारी व मजुरांच्या स्वतंत्र सुरक्षित वाहतुकीची सोय सरकारने करावी आदी मागण्या ‘केमिट’ चे अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांनी केल्या आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times