महाराष्ट्रात इंजेक्शन पुरवण्यास केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. उत्पादक कंपन्यांनी महाराष्ट्र सरकारला रेमडेसिवीर दिले तर त्या त्यांचे परवाने रद्द केले जातील, अशी धमकी केंद्रानं दिल्याचा गंभीर आरोप मलिक यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता. मलिक यांच्या या आरोपामुळं भाजपमध्ये अस्वस्थता होता. मलिक यांनी खोटा आरोप केला असून त्यामुळं लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. लोक महाराष्ट्र सोडून चालले आहेत, असं उलट आरोप करत भाजपनं मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. भाजपचे काही नेते राज्यपालांनाही भेटले होते. मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या या भूमिकेचा समाचार घेतला.
वाचा:
‘राज्यात रेमडेसिविरचा तुटवडा असताना काही कंपन्या राज्य सरकारला रेमडेसिविर द्यायला तयार नव्हत्या. ब्रुक फार्माला महाराष्ट्र सरकारच्या एफडीएनं परवानगी दिली होती. मात्र, ही कंपनी केंद्रशासित दमणमध्ये रेमडेसिविरची निर्मिती करते. तेथील प्रशासनानं महाराष्ट्राला पुरवठा करता येणार नाही असे निर्बंध त्यांच्यावर घातले होते. त्यामुळं कुठेतरी केंद्र सरकारकडून अडवणूक होते आहे असा मुद्दा मी उपस्थित केला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी संवाद साधला होता. केवळ राजकारण करण्यासाठी आम्ही हा मुद्दा उपस्थित केला नव्हता. लोकहितासाठीच आम्ही बोलत होतो. मात्र, करोना संकटाचा फायदा घेऊन भाजपचे लोक काही दिवसांपासून राज्य सरकारला बदनाम करत आहेत. मी रेमडेसिविरचा मुद्दा उपस्थित केल्यानं माझ्या राजीनाम्याची मागणी होतेय. जावयाला अटक झाल्यामुळं मलिक केंद्र सरकारच्या विरोधात बोलताहेत असं फडणवीस म्हणत होते. पण महाराष्ट्राची जनता सर्व काही जाणते. माझ्या जावयाचा विषय न्यायालयात आहे. तिथं काय व्हायचं ते होईल,’ असं मलिक म्हणाले.
भाजप नेत्यांच्या आरोपांवर आज मी बोलणार नाही, पण अनेक गोष्टींचा भांडाफोड मी आज ना उद्या करणार आहे. क्रिस्टल कंपनीचा कारभार किती पारदर्शक आहे? भतीजाचा किती भात कोणी खाल्लेला आहे? कांदिवली, मालाडचे आमदार काहीबाही बोलत असतात. ते रात्री कुठे जातात? दुपारी कोणाबरोबर बसतात? त्यांच्या जवळचे लोक ईडीच्या मार्फत किती तुरुंगात आहेत? त्यांच्याकडून त्यांनी काय-काय घेतलंय? हे लवकरच सांगेन. आता राजकारण करणार नाही. नवाब मलिक हा कधीही दबावाखाली बोलत नाही,’ असंही मलिक यांनी सुनावलं.
वाचा:
भाजपकडून होणाऱ्या राजीनाम्याच्या मागणीचीही त्यांनी खिल्ली उडवली. ‘देशात कुठला ‘मोदी अॅक्ट’ नावाचा नवा कायदा आलाय का? त्या कायद्याच्या अंमलबजावणीचे अधिकार राज्यपालांकडे आहेत का? तसं असेल तर त्याची माहिती जनतेला द्या. मुद्द्यावर बोला. उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या,’ असं मलिक म्हणाले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times