मुंबईः करोना प्रतिबंधित लसीचा तुटवडा राज्यात मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. मुंबईतील सर्वात मोठे लसीकरण केंद्र असलेल्या वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) येथील लसीचे डोस संपल्याचं वृत्त समोर येत आहे.

बीकेसीतील जम्बो कोविड सेंटरमध्ये लसीकरण केंद्राच्या बाहेर आज लस संपल्यानं नागरिकांना लस न घेताच पुन्हा माघारी फिरावं लागलं आहे. त्यामुळं लसीकरणासाठी आलेल्या अनेक वयस्कर नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागल्याचंही सांगण्यात येत आहे. तर, काही नागरिकांनी लसीकरणासाठी उन्हात रांगेत उभं असल्याचं चित्र होतं.

‘कोविशील्डचे ३५० ते ४०० डोस केंद्रात उपलब्ध होते. मंगळवार सकाळपासून ज्यांनी केंद्रावर नोंदणी केली त्या नागरिकांना देण्यात आले आहेत. मात्र, त्यानंतर लसीचा पुरवठा झालेला नाही. त्यामुळं पहिला डोस घेणाऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे. दुसरा डोस देण्यासाठी कोव्हॅक्सिनचे दोन हजार डोस उपलब्ध असून ते आज दिवसभरात दिले जातील,’ असं लसीकरण केंद्राचे प्रमुख राजेश डेरे यांनी सांगितलं आहे.

‘संध्याकाळपर्यंत आम्हाला कोव्हिशील्डचे डोस पुरवले जातील, असं सांगण्यात आलं आहे. जर डोस मिळाले तर पुन्हा लसीकरण सुरु केलं जाईल. कोव्हिशील्डच्या लसी संपल्यासंदर्भात काल रात्री उशीरा माहिती मिळाली,’ असंही डेरे यांनी स्पष्ट केलं आहे.

महाराष्ट्रात सध्या करोना रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला जात आहे. यामुळे राज्य सरकारने आपला लसीकरणाचा वेगदेखील वाढविला आहे. सध्या राज्याकडे लसतुटवडा असल्याचं चित्र वेळेवेळी समोर येत आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here