औरंगाबाद: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे नातू वकर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांना मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने समन्स बजावले आहे. रोहित पवार यांना अपात्र ठरवण्यात यावे, अशी विनंती करणारी एक याचिका भाजपचे माजी आमदार राम शिंदे यांनी दाखल केली असून या याचिकेवरूनच खंडपीठाने आज रोहित पवार यांना समन्स बजावले.

रोहित पवार यांनी गैरमार्गांचा वापर करून विधानसभा निवडणूक जिंकली आहे. त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने निवडणूक जिंकण्यासाठी कर्जत-जामखेडमध्ये भ्रष्ट मार्गांचा अवलंब केला. मतदारांना पैशांची लाच देणे, विरोधकांचे चारित्र्यहनन करणे असे हातखंडे निवडणूक जिंकण्यासाठी वापरण्यात आले. रोहित पवार यांनी निवडणूक खर्च सादर करताना अनेक खर्चांचा तपशील लपवला आहे, असा आरोप राम शिंदे यांच्या याचिकेत करण्यात आला आहे. अॅड. एस. बी तळेकर आणि माधवी अय्यपन यांनी शिंदे यांच्यावतीने ही याचिका दाखल केली.

न्या. एस. एम. गव्हाणे यांच्या एकसदस्यीय खंडपीठापुढे ही याचिका दाखल करण्यात आली असून आजच्या सुनावणीत याचिकादाराचा थोडक्यात युक्तिवाद ऐकून कोर्टाने रोहित पवार यांना समन्स बजावले. संबंधित याचिकेवर रोहित पवार यांनी २० मार्चपर्यंत प्रतिज्ञापत्राद्वारे आपले म्हणणे मांडावे, असे कोर्टाने नमूद केले आहे.

रोहित यांनी दिला होता पराभवाचा धक्का

विधानसभा निवडणुकीत नगरमधील कर्जत-जामखेड मतदारसंघातील लढत महाराष्ट्रात सर्वात लक्ष्यवेधी ठरली होती. माजी मंत्री व भाजपचे नेते राम शिंदे यांच्यापुढे रोहित पवार यांनी आव्हान उभे केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी ही लढत प्रतिष्ठेची केली होती. या लढाईत रोहित पवार यांनी बाजी मारत राम शिंदे यांना पराभवाचा धक्का दिला होता. या निकालानंतर रोहित यांनी थेट राम शिंदे यांच्या घरी जात राजकारणापलीकडे जाऊन मतदारसंघाच्या हितांसाठी सर्वांनी एकत्र काम करायला हवं, असा संदेश दिला होता. राम शिंदे यांच्या आईचे त्यांनी आशीर्वादही घेतले होते. या भेटीने निवडणुकीत आलेलं वितुष्ट काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसत होते. मात्र आता राम शिंदे यांनी रोहित यांच्याविरुद्ध याचिका दाखल केल्याने कर्जत-जामखेडची लढाई कोर्टात पोहचली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here