मनोज जयस्वाल । बुलडाणा

बुलडाणा: जिल्ह्यात कालपासून भाजप आमदार संजय गायकवाड आणि शिवसेना आमदार संजय कुटे यांच्‍यातील युद्ध अखेर शमले आहे. सकाळी आमदार कुटे यांनी हा विषय आमच्‍यासाठी संपल्याचे जाहीर केल्यानंतर दुपारच्‍या सुमारास खासदार प्रतापराव जाधव यांनीही शिवसेनेकडून हा विषय संपल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी सुरू झालेला सेना-भाजपच्या आरोप प्रत्यारोपाच्या हायव्होल्टेज ड्राम्यावर अखेर पडदा पडला आहे.

आज सकाळी महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील जवळपास सर्वच नेते बुलडाण्यात दाखल झाले होते. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन दिले. त्‍यानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार जाधव म्‍हणाले, की दुर्दैवाने अशा घटना घडू नये. भावनेच्‍या आहारी जाऊ नये. सर्वांनी शब्‍द मोजून मापून वापरले पाहिजेत. आपल्या कुणा जवळच्‍या व्‍यक्‍तीला, कार्यकर्त्याला बेड उपलब्‍ध होत नाही, ऑक्सिजन सिलिंडर उपलब्‍ध होत नाही, इंजेक्‍शन उपलब्‍ध होत नाही. त्‍यामुळे त्रागा होतो. त्‍यातून अपशब्‍दही निघतो. मात्र त्‍याचा बाऊ करण्याची आवश्यकता नाही. त्‍यामागील भावना समजून घेतल्या पाहिजेत, असं शिवसेनेचे खासदार जाधव यांनी म्हटलं आहे.

‘सध्या काही लढाई करण्याचे दिवस नाहीत. भांडण्याचे दिवस नाहीत. माझी सर्वांना विनंती आहे की जिल्ह्यात शांतता राहिली पाहिजेत. आमच्‍यासाठी हा विषय आता संपलेला आहे. ज्‍याला कुणाला शक्‍ती प्रदर्शन करायचे असेल त्‍यांनी आपली शक्‍ती करोनाविरोधात लढण्यासाठी वापरावी. आपल्या लोकांचे, कार्यकर्त्यांचे, नातेवाइकांचे जीव वाचविण्यात शक्‍ती खर्च करावी. शक्‍ती प्रदर्शन करण्याची गरज आताच्‍या काळात तरी नाही, असेही खासदार प्रतापराव जाधव म्‍हणाले.

काय आहे वाद?

रेमडेसिविर व ऑक्सिजनच्या तुटवड्यावरून केंद्र व राज्य सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. करोनाच्या संकट काळात राज्य सरकारला मदत करण्याऐवजी केंद्र सरकार प्रत्येक ठिकाणी अडवणूक करत आहे, अशी महाविकास आघाडीच्या नेत्यांची भावना आहे. त्याच अनुषंगानं बोलताना संजय गायकवाड यांनी रविवारी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली होती. ‘भाजपसारखं खालच्या पातळीचं राजकारण देशातच काय, जगातही कुणी करत नसेल. ह्यांना लाज वाटली पाहिजे,’ असं गायकवाड म्हणाले होते. तसंच, भाजपच्या लोकांबद्दल माझ्या मनात प्रचंड तिरस्कार असल्याचा संतापही त्यांनी व्यक्त केला होता. करोनाचे जंतू भेटले तर फडणवीसांच्या तोंडात नेऊन कोंबले असते, असंही ते म्हणाले होते. यावरुन राजकीय वातावरण तापलं होतं. भाजपनंही गायकवाड यांच्यावर टीका केली होती.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here