चेन्नई : दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर सहजपणे विजय साकारला. या विजयासह दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने आरसीबीला धक्का देत गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे. आजच्या सामन्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा संघ हा तिसऱ्या स्थानावर होता. आजच्या सामन्यात विजय मिळवल्यावर दिल्ली कॅपिटल्सचे सहा गुण झाले आहेत. आरसीबीचेही सहा गुण असले तरी त्यांचा रनरेट हा दिल्लीच्या संघापेक्षा जास्त आहे, त्यामुळे सहा गुण असूनही त्यांनी अव्वल स्थान पटकावले आहे. पण या पराभवामुळे मुंबई इंडियन्सचे गुणतालिकेत नुकसान झाले आहे. त्यांना आपले चौथे स्थान गमवावे लागले नसले तरी त्यांची नररेट मात्र फारच कमी झाला आहे. याचा फटका त्यांना प्ले-ऑफध्ये पोहोचण्यापूर्वी बसू शकतो.

मुंबई इंडियन्सचे १३८ धावांचे आव्हान माफक वाटत होते. पण यावेळी दिल्लीची सुरुवात चांगली झाली नाही. पृथ्वी शॉ याला जयंत यादवने बाद करत दिल्लीला पहिला धक्का दिला. पृथ्वीला यावेळी सात धावा करता आल्या. पृथ्वी बाद झाला असला तरी त्यानंतर स्टीव्हन स्मिथ आणि शिखर धवन यांच्यामध्ये चांगली भागीदारी झाली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ५३ धावा जोडल्या. पण कायरन पोलार्डने यावेळी स्मिथला बाद करत दिल्लीला मोठा धक्का दिला. स्मिथने ३३ धावा केल्या. स्मिथ बाद झाल्यावर शिखर धवनने चांगली फटकेबाजी केली, पण त्याचे अर्धशतक यावेळी पाच धावांनी हुकले. धवनने ४२ चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ४५ धावा केल्या. पण त्यानंतर शिमरॉन हेटमायर आणि ललित यादव यांनी अखेरच्या षटकात संघाला विजय मिळवून दिला.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सला क्विंटन डीकॉकच्या रुपात पहिला धक्का बसला. डीकॉकला यावेळी फक्त एकच धाव करता आली. पण त्यानंतर मात्र मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी दमदार फलंदाजी केली. या दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी रचली. सूर्यकुमारला यावेळी ३४ धावा करता आल्या. सूर्यकुमार बाद झाल्यावर रोहितने काही काळ फलंदाजी केली खरी, पण त्याला यावेळी मोठी धावसंख्या उभारता आली नाही. रोहितने यावेळी यंदाच्या आयपीएलमधील सर्वाधिक धावा केल्या, पण त्याला मोठी खेळी साकारता आली नाही. दिल्लीचा फिरकीपटू अमित मिश्राने यावेळी रोहित शर्माला बाद केले. रोहितने यावेळी ३० चेंडूंत ३ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ४४ धावा केल्या. अमित मिश्राने याच नवव्या षटकात रोहितनंतर हार्दिक पंड्यालाही बाद केले. यावेळी हार्दिकला भोपळाही फोडता आला नाही. हार्दिकनंतर कृणाल पंड्या आणि कायरन पोलार्डही लवकर बाद झाले आणि मुंबई इंडियन्सच्या संघाची ६ बाद ८४ अशी अवस्था झाली. पण त्यानंतर जयंत यादव आणि इशान किशन यांनी चांगली भागीदारी केल्यामुळे मुंबई इंडियन्सला १३७ धावा करता आल्या.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here