छत्तीसगडमधील दंतेवाडा हा जिल्हा नक्षलवाद्यांच्या हिंसाचारामुळे देशाला परिचित आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने दंतेवाडामध्ये १८ ते २७ एप्रिलपर्यंत लॉकडाउन घोषित केला आहे. या ठिकाणी तैनात आहेत पोलिस उपअधीक्षक (DSP) शिल्पा साहू. पोलिस अधिकारी असलेल्या या ५ महिन्यांच्या गर्भवती आहेत. त्यातच करोनाच्या या संकटात संसर्गाचाही धोका आहे. पण घरी बसून राहण्याऐवजी त्या कर्तव्य बजावत आहेत. कडक उन आणि नक्षलवाद्यांचा धोका असूनही त्या आपलं कर्तव्य बजावत आहेत.
शिल्पा यांनी ड्युटी करावी, असा त्यांच्यावर कुठलाही दबाव नाही. हवं असतं तर त्या घरी बसून आराम करू शकल्या असत्या. पण कठीण परिस्थिती काम करणं गरजेचं असल्याचं त्यांना वाटलं. पोलिसांच्या पथकासोबत त्या रस्त्यावर उतरल्या आहेत. हातात पोलिसांची लाठी घेऊन त्या कधी नागरिकांना प्रेमाने तर गरज पडल्यास नियमांचं पालन करण्याचा इशारा देत आहेत. घरातच राहा, सुरक्षित राहा, असं त्या सांगत आहेत.
नक्षलवाद्यांच्या बालेकिल्ल्यात बिनधास्त जातात
जिल्ह्यात DRG ची एक टीम आहे. या टीमचं नाव दंतेश्वरी फायटर्स असं आहे. डीएसपी शिल्पा या याच टीमला लीड करतात. नक्षलावद्यांच्या भागात बिनधास्त फिरतात. तेलम, टेटम, निलवाया, गुमियापा, चिकपाल, मारजूमसह असे अनेक भाग आहेत जिथे शिल्पा या स्वतः नक्षलवाद्यांचा सामना करतात. शिल्पा आणि त्यांच्या टीमने अनेकदा नक्षलवाद्यांचे मनसुबे उधळून लावले आहेत. त्यांनी अनेक IED निकामी केले आहेत.
…म्हणून ड्युटीवर आले
पोलिसांच्या पथकाचं मनोबल वाढवण्यासाठी आपण अशा परिस्थितीतही ड्युटीवर आहोत. पोलिस कुठल्याही परिस्थितीत त्यांच्यासोबत आहेत, हे नागरिकांना कळले पाहिजे. आम्ही लोकांसाठी घरा बाहेर आहोत. यामुळे लोकांनी घरातच राहावं, असं आमचं आवाहन असल्याचं डीएसपी शिल्पा साहू यांनी सांगितलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times