नाशिक शहरातील प्रमुख समजल्या जाणाऱ्या जाकीर हुसैन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन टॅंकला गळती लागल्याने हजारो लिटर ऑक्सिजन वाया गेल्याची घटना आज दुपारी एक वाजता घडली. यावेळी १३१ रुग्ण महापालिकेच्या जाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. यातील चार ते पाच जणांची प्रकृती चिंताजनक असून इतर काही लोकांना हा दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्याची तयारी सुरू आहे.
रुग्णालयात करोना रुग्णांवर उपचार करण्यात येत असून रुग्णालयात सध्या १३१ रुग्ण आहेत. यातील चार ते पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा यासाठी जिल्हा रुग्णालयातून अतिरिक्त साठा मागवण्यात आला आहे. रुग्णालय प्रशासनाकडून ऑक्सिजन टँकमधून होणारी गळती थांबवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. तसंच, वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत. ऑक्सिजन टँकरमधून टाकीत भरला जात असताना ही गळती सुरु झाल्याची माहिती मिळत आहे.
झाकीर हुसेन हॉस्पिटल नाशिक शहरातील सगळ्यात मोठे हॉस्पिटल समजले जाते. या ठिकाणी शहरातील नागरिकांसह, जिल्ह्यातील रुग्णांवरही प्रमाणात उपचार केले जातात. या ठिकाणी सध्या १३१ रुग्ण उपचार घेत होते. १७० बेडचं हे हॉस्पिटल असून त्यामध्ये १७ बेड हे व्हेंटिलेटर असे होते. सहा ते सात लोकांना इतर ठिकाणी हलवण्यात आले आहे. नुकतंच दहा सिलेंडर सिव्हिल हॉस्पिटलमधून या रुग्णालयात आणण्यात आले असून तातडीने त्याची जोडणी पूर्ण करण्यात आली आहे.
११ रुग्णांचा मृत्यू
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, ऑक्सिजन गळती झाल्यामुळं ११ रुग्ण दगावले आहे. रुग्णालय प्रशासनाच्या हवाल्यानं त्यांनी ही माहिती दिली आहे. मात्र, अद्याप रुग्णालय प्रशासनानं कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाहीये.
३० ते ३५ रुग्ण दगावण्याची भिती
झाकीर हुसैन रुग्णालयाच्या व्हेंटिलेटर कक्षामध्ये किंवा ऑक्सिजन सुरु असलेल्या केलेल्या रुग्णांची संख्या साधारण ६१ इतकी होती. यातील तीस ते पस्तीस दगावतील अशी भीती, शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांनी व्यक्त केली आहे. ज्या कंपनीनं ऑक्सिजन प्लांट येथे त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, व नुकसानभरपाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times