मिळालेल्या माहितीनुसार, परतवाडा-धारणी चिखलदरा मार्गावर दुचाकीस्वारांना चाकूचा धाक दाखवून लुटल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. १० एप्रिल रोजी सलोना येथील बापलेक हिराजी बेलसरे व किशोर बेलसरे हे दुचाकीवरून परतवाडा येथे आले होते. एटीएममधून पैसे काढून त्यातून काही वस्तू खरेदी केल्या होत्या. त्यानंतर ते सलोनाकडे जाण्यासाठी निघाले. बिहाली गावाजवळ दुपारी २ वाजताच्या सुमारास पाठिमागून दुचाकीवरून दोन अनोळखी व्यक्ती आल्या. त्यांनी बेलसरे यांची दुचाकी आोव्हरटेक करून आडवी घातली. तुम्ही गोणीमध्ये काय घेऊन चालले आहेत, अशी विचारणा केली. त्यानंतर त्यांना चाकूचा धाक दाखवून बेलसरे यांच्या खिशातील ३४, ८०० रुपये काढून पसार झाले. फिरोज खान दिलावर खान (वय २१, दिलावरपुरा, अचलपूर) आणि जय नारायण हिंगणकर (विलायतपुरा, अचलपूर) अशी दोघांची नावे आहेत.
या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी तपास सुरू केला. या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यात फिरोज आणि जय हे दोघे दिसून आले. या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडील दुचाकी, चांदीची चेन, मोबाइल आणि रोकड असा एकूण १ लाख ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. हरीबालाजी एन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तपन कोल्हे, सहायक पोलीस निरीक्षक गोपाल उपाध्याय, त्र्यंबक मनोहर, सुनील महात्मे, प्रमादे खर्चे, सै. अजमद, योगेश सांभारे, प्रवीण अंबाडकर, अमोल केंद्रे, सागर धापड, सविता चौधरी यांच्या पथकाने केली. चिखलदरा ठाणेदार राहुल वाढीवे, सहायक पोलीस निरीक्षक शहाजी रुपनर यांनी या घटनेचा तपास केला.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times