‘द गार्डियन’मध्ये प्रकाशित झालेल्या लेखात भारतातील परिस्थितीवर भाष्य करण्यात आले आहे. शनिवारी झालेल्या पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण सभेला इतकी गर्दी पाहिली नव्हती असे म्हटले. तर, त्याच दिवशी भारतात एकाच दिवसात दोन लाख ३४ हजार करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. ही भारतातील सर्वोच्च संख्या आहे. भारतात सत्ताधारी भाजप, पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका सुरू झाली आहे. भारतातील सत्ताधाऱ्यांसह, राजकीय नेते, कार्यकर्त्यांसह आरोग्य अधिकारीदेखील आपण करोनाचा पराभव केला या भ्रमात वावरत राहिले, त्याचा फटका बसला असल्याचे या लेखात म्हटले आहे. काही तज्ज्ञ, डॉक्टरांनी फेब्रुवारीतच करोनाची दुसरी लाट येण्याचा इशारा दिला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
भारताच्या राजधानीत ऑक्सिजनचा तुटवडा असल्याचे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले आहे. मोठ्या शासकीय रुग्णालयांमध्ये काही तासांसाठीचा ऑक्सिजन साठा असल्याचे वृत्तात म्हटले आहे. तर, करोनाबाधितांसाठी ऑक्सिजन व इतर प्रकारच्या मदतीसाठी भारतात नागरिकांसह अधिकाऱ्यांकडूनदेखील सोशल मीडियाचा आधार घेतला जात असल्याचे ‘द गार्डियन’ने आपल्या वृत्तात म्हटले आहे.
अमेरिकेतील वॉशिंग्टन पोस्टने भारतातील परिस्थितीतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. चार महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनावर विजय मिळवला असल्याचे म्हटले होते. मात्र, सध्या भारतात करोनाची दुसरी लाट आली असून दोन लाख ५० हजार बाधित आढळत आहेत. करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे भारताची आरोग्य व्यवस्था कोलमडली असल्याचे ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने म्हटले आहे.
भारताने करोनाबाधितांच्या यादीत ब्राझीलला मागे ढकलले आहे. भारतात करोनाबाधितांची संख्या समोर आलेल्या आकड्यांपेक्षा अधिक असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही राज्यांमध्ये कमी करोना चाचणी होते असल्याकडे ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने म्हटले. अंत्यसंस्कारासाठी मृतदेहांच्या रांगा लागल्या असून करोना मृतांची संख्याही समोर आलेल्या आकडेवारीपेक्षा अधिक असण्याची शक्यता ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने व्यक्त केली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times