मुंबईः राज्यातील करोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने ब्रेक द चेनच्या माध्यमातून बुधवारी रात्री आणखी काही नव्या निर्बंधांची घोषणा केली आहे. त्यानुसार, सर्वसामान्य जनतेच्या प्रवासावरही काही निर्बंध आले आहेत. त्यामुळं अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

‘एसटी बसेस जिल्हांतर्गत, जिल्ह्याबाहेर देखील चालतील. परंतु त्या केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच चालणार आहेत. या संदर्भात एसटीचा संपूर्ण कार्यक्रम कसा असेल याबाबत चर्चा करण्यासाठी मंत्रालयात अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीनंतर अंतिम निर्णय होईल,’ अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे. तसंच, ‘आता सरकारने ज्या काही गाइडलाईन्स दिल्या आहेत, त्यानुसार एसटी बस अत्यावश्यक सेवेसाठीच असतील, त्यामुळं एसटीची संख्या कमी असेल,’ असं त्यांनी नमूद केलं आहे.

विरोधकांच्या टीकेपेक्षा जीव वाचवणं महत्त्वाचं

प्रसारमाध्यमांशी बोलत असताना यावेळी त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला आहे. ‘विरोधक काय टीका करतात, या पेक्षा लोकांचे प्राण वाचवणं आम्हाला जास्त गरजेचं आहे. त्यासाठी जे काही निर्बंध लावायचे आहेत, ते जी रुग्णसंख्या वाढते आहे ते घटवण्याचं हा प्रयत्न आहे. अंतर्गत हे काम सुरु आहे. त्यामुळं आता कोण काय बोलतं या पेक्षा लोकांना कोणताही त्रास होणार नाही, हे पाहणं महत्त्वाचं आहे,’ असा टोला परब यांनी लगावला आहे.

दरम्यान, बुधवारी रात्री राज्य सरकारने नव्या निर्बंधांची घोषणा केली आहे. त्यानुसार सर्वसामान्य नागरिकांनी लोकल, गाड्या, मेट्रो, मोनो आणि बस यातून प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसंच, खासगी प्रवासासाठी जिल्हा बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here