केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल हे बुधवारी दमोहमध्ये रुग्णालयात पोहोचले. पटेल हे रुग्णालयातील व्यवस्थेची पाहणी करत होते. यादरम्यान, एक तरुण त्यांच्याकडे आला. ‘आई आजारी आहे. तिच्यासाठी ऑक्सिजन सिलिंडर मिळत नाहीए. एक तास होऊन गेला. अजूनही मिळालेलं नाही’, असं तो तरुण पटेल यांना म्हणाला. ‘आधी आपली भाषा ठीक कर, असं बोलशील तर दोन थप्पड खाशील’, असं उत्तर पटेल यांनी त्या तरुणाला दिल्याचं व्हिडिओत दिसतंय.
मंत्र्यांचं बोलणं ऐकून तरुणाने त्यांना उलट उत्तर दिलं. ‘हो आम्ही दोन थप्पड खाऊ. माझी आई आजारी आहे. आम्ही काय करू सांगा. ३६ तासांपासून चिंतेत आहोत. ऑक्सिजन सिलिंडर मिळाला तर तो फक्त ५ मिनिटंच चालतो. तुम्ही सिलिंडर उपलब्ध करू शकत नसाल तर नाही म्हणून सांगा’, असं तो तरुण बोलताना दिसतोय. मंत्र्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.
या घटनेवरून वाद निर्माण होत असल्याचे पाहून प्रल्हाद पटेल यांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आले. डॉक्टर आणि नर्सेसबद्दल असभ्य भाषा करणाऱ्या तरुणाला केंद्रीय मंत्र्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला होता, असं त्यात म्हटलं आहे. ‘हे सगळे आपल्याला मूर्ख बनवत आहेत. ३६ तास झाले आहे. आपण अस्वस्थ आहोत. हे सांगत आहेत सिलिंडर देणार म्हणून. पण अजूनही मिळालेलं नाही. ऑक्सिजन मिळणार नाही, असं ते स्पष्ट का सांगत नाही’, असं ऑनलाइन व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तो तरुण बोलताना दिसतोय. त्याच्या या बोलण्यावरून केंद्रीय मंत्री नाराज झाले. ‘असं बोलशील तर दोन थप्पड खाशील’, असं ते म्हणाले.
दरम्यान, ऑक्सिजनचा पुरवठा आणि त्याच्या उपलब्धतेसंबंधी पंतप्रधान मोदींनी गुरुवारी उच्चस्तरीय बैठक घेतली. त्यांनी ऑक्सिजन पुरवठ्या संबंधी विविध मुद्यांवर चर्चा केली. यावेळी गेल्या काही दिवसांमध्ये ऑक्सिजन पुरवठ्यात केलेल्या सुधारणांवर अधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदींना माहिती दिली. ऑक्सिजनचे उत्पादन वाढवणं, ऑक्सिजनच्या पुरवठ्यात गती आणणं आणि अभिनव पद्धतीने आरोग्य सुविधा निर्माण करून ऑक्सिजन पुरवण्यावर काम करण्याची आवश्यकता असल्याचं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times