अकोला: जिल्ह्यातील तालुक्यात दुर्दैवी घटना घडली. गिट्टीची वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरने मागून दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरून जात असलेल्या तरुणीचा मृत्यू झाला. तर तिचे वडील जखमी झाले आहेत. तरुणीचे २६ एप्रिल रोजी लग्न होणार होते. त्याआधीच सुखी संसाराची स्वप्ने बघणाऱ्या या नवऱ्यामुलीवर काळाने घाला घातला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

रस्त्यावर गुरुवारी रात्री ही दुर्दैवी घटना घडली. पल्लवी धोत्रे असे मृत तरुणीचे नाव आहे. ती पातूर तालुक्यातील विव्हरा येथे राहत होती. पल्लवी आणि तिचे वडील अनिल धोत्रे हे दुचाकीवरून पातूर-बाळापूर रस्त्यावरून वाडेगावकडे जात असताना देऊळगाव बसस्थानकाजवळ झाला. पातूर येथून देवीचे दर्शन घेऊन ते परत येत होते. त्याचवेळी हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, पल्लवी आणि तिचे वडील अनिल धोत्रे हे दुचाकीवरून विव्हरा येथे घरी परतत होते. त्याचवेळी गिट्टीने भरलेल्या ट्रॅक्टरने मागून त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातानंतर तिचे वडील रस्त्यावर पडले. तर पल्लवीच्या अंगावरून चाक गेल्याने ती गंभीर जखमी झाली. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या दोघांनाही देऊळगाव येथील रुग्णालयात नेले. पल्लवी गंभीर जखमी झाल्याने तिच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच, तिचा मृत्यू झाला. ट्रॅक्टर चालकाला पातूर पोलिसांनी अटक केली आहे.

२६ एप्रिलला होते लग्न

पातूर तालुक्यातील विव्हरा येथील पल्लवी धोत्रे हिचे अकोला तालुक्यातील धोतरडी येथील तरुणासोबत लग्न ठरले होते. येत्या २६ एप्रिलला हा लग्नसोहळा पार पडणार होता. घरात लग्नाची तयारी सुरू होती. कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण होते. या आनंदावर विरजण पडले. पल्लवी आणि तिचे वडील दुचाकीवरून जात असताना अपघात झाला आणि यात पल्लवीचा मृत्यू झाला. पल्लवीचे कुटुंब आणि वराच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here