जयंत सोनोने / अमरावतीः हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात ( ) निलंबित आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्या जामीन अर्जावर गुरुवारी अचलपूर येथील प्रथम तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. के. मुंगीनवार यांनी सरकारी व आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकला. न्यायालयाने शुक्रवारी त्यावर निर्णय देत आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याचा जामीन अर्ज फेटाळला.

शिवकुमार सरकारी अधिकारी असून त्यांचे मुख्यालय नागपूर येथे केल्याने पळून जाण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. ते वेळोवेळी तपास कामाला मदत करतील. २० दिवसांपेक्षा अधिक काळापासून ते न्यायालयीन कोठडीत आहे. त्यामुळे त्यांचा जामीन अर्ज मंजूर करावा, असा युक्तिवाद प्रशांत देशपांडे यांनी केला.

हरिसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी २५ मार्च रोजी उपवनसंरक्षक आरोपी विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. पीसीआरनंतर त्याची ३० एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. तेव्हापासून आरोपी जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये आहे. त्याच्या जामिनासाठी अभियोक्ता प्रशांत देशपांडे यांनी अचलपूर न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. त्यावर १९ एप्रिल रोजी सरकारी पक्षाच्यावतीने अभियोक्ता भोला चव्हाण व तपास अधिकारी पूनम पाटील यांनी ‘से‘ दाखल केला. त्यानंतर गुरुवारी जिल्हा सरकारी अभियोक्ता परीक्षित गणोरकर यांनी सरकारच्या वतीने युक्तिवाद केला. सहकारी सरकारी अभियोक्ता बी. आर चव्हाण, गोविंद विचोरे यांनी सहकार्य केले.

विनोद शिवकुमार यांचे वकील प्रशांत देशपांडे म्हणाले की, शिवकुमार हे कर्तव्यदक्ष व मेहनती अधिकारी होते. उपवनसंरक्षक जेथे जातो तेथे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना जावे असा प्रोटोकॉल आहे. जंगलाच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर असते. कामासंदर्भात बोलने हा विनोद शिवकुमार यांचा कर्तव्याचा भाग आहे. दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या करावी, असा कुठलाच उद्देश विनोद शिवकुमार यांचा नव्हता.

यावर जिल्हा सरकारी अभियोक्ता परिक्षित गणोरकर म्हणाले की, विनोद शिवकुमार यांनी तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे दीपाली चव्हाण यांनी मृत्युपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीतून दिसून येते. त्यावरुनच गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी घटना घडताच पळून गेला. अपराधी कृत्य करणे हा सुद्धा ड्युटीचा भाग होऊ शकत नाही. एक वर्षापासून दीपाली चव्हाण यांना त्रास दिला जात होता. त्यामुळेच आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी ‘मी कंटाळले’ असे लिहिले आहे. या घटनेचे गांभीर्य पाहता तपास अजून सुरू आहे. त्यामुळे वरिष्ठ कार्यालयात बसून साक्षीदारांवर दबाव टाकून फितूर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. जामीन अर्ज खारीज करण्याचा युक्तिवाद सरकारी अभियोक्ता गणोरकर यांनी केला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here