सध्या सर्वत्र इंजेक्शनसाठी धावाधाव सुरू असताना नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मात्र आपल्या जिल्ह्यासाठी गोपनीयरित्या ‘करेक्ट कार्यक्रम’ केला आहे. दिल्लीतील एका कंपनीतून त्यांनी अहमदनगरसाठी खासगी विमानाने इंजेक्शन्स आणली. तो सर्व साठा संपल्यानंतर त्यांनी स्वत: सोशल मीडियात व्हिडिओ शेअर करून याची माहिती दिली आहे. त्यांनी आकडा सांगितला नसला तरी या माध्यमातून त्यांनी दहा हजार इंजेक्शन्स आणल्याचे सांगण्यात येते. ( brought remedesivir injection from a delhi based company on a private plane)
काही दिवसांपूर्वी डॉ. विखे यांनी शिर्डी विमानतळावर दिल्लीहून ही इंजेक्शन्स आणली होती. ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शिर्डी संस्थान, प्रवरा रुग्णालय व जिल्हा रुग्णालयास ती मोफत देण्यात आली. मात्र, त्याचवेळी मुंबईत भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये गुजरातमधून आणलेल्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनवरून वाद सुरू होता. त्यामुळे त्यावेळी विखे यांनी आपण कोठून आणि नेमकी किती इंजेक्शन्स आणली हे सांगणे टाळले होते.
आज स्वत: डॉ. विखे यांनीच ही माहिती व्हिडिओद्वारे जाहीर केली आहे. जिल्ह्यात रेमडेसिव्हिरचा तुटवडा जाणवत होता. सगळेच हतबल झाले होते. लोकप्रतिनिधी म्हणून आपण हे पाहू शकत नव्हतो. त्यामुळे पक्ष बाजूला ठेवून आपल्या लोकांसाठी काही करावे या उद्देशाने खासगी विमान करून आपण दिल्लीतून ही इंजेक्शन्स आणली आहेत. यात पक्षाचा संबंध नाही, असे सुजय विखे म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
ते पुढे म्हणाले की, ‘विखे पाटील कुटुंब आणि प्रवरा एज्युकेशनच्या माध्यमातून देशभरातील उद्योजकांशी संबंध आहेत. त्याचा फायदा झाला. आम्ही दिल्लीतील एका कंपनीत जाऊन तेथून ही इंजेक्शन्स आणली. कोणताही वाद होऊ नये, यासाठी जाहीर करणे टाळले. गरजू रुग्णांना ती देण्यात आली. यातून हजारो रुग्णांचे प्राण वाचवू शकलो याचे समाधान आहे. आता तो साठा संपला आहे. ही माहिती मी मुद्दाम दोन दिवस उशिरा जाहीर करीत आहे. यामुळे माझ्यावर कारवाई होणार की नाही, माहिती नाही. मात्र, हे काम आपण लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या लोकांचे जीव वाचविण्यासाठी म्हणून केले आहे. येत्या काही दिवसांत विविध माध्यमांतून हे औषध तसेच ऑक्सिजनही उपलब्ध होत आहे.
क्लिक करा आणि वाचा-
नगर जिल्ह्याला उद्योजक मुकेश अंबानी यांनी पाठविलेला ऑक्सिजनचा एक टँकर आजच मिळाला आहे. सरकारतर्फे मागविण्यात आलेला ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हिरही लवकरच मिळणार आहे. आपण प्रशासनाच्याही संपर्कात असून येत्या तीनचार दिवसांत नगरकरांची यासंबंधीची चिंता मिटणार आहे. हे काम करताना आपण कोणताही पक्षीय विचार समोर ठेवलेला नाही, असे सांगत असताना आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनानेही त्याच पद्धतीने काम करावे, यात गैरप्रकार झालेले खपवू घेतले जाणार नाहीत,’ असा इशाराही डॉ. विखे यांनी दिला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times