बुद्धीची देवता, विद्येची देवता, ब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, गणांचा अधिपती, चौदा विद्या, चौसष्ट कलांचा स्वामी असलेल्या गणपीला हिंदू धर्मात अनन्य साधारण असे स्थान आहे. अनेक प्रकारे त्याची भक्ती केली जाते. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे. जाणून घेऊया संकष्ट चतुर्थीची कथा आणि आजच्या चंद्रोदयाची वेळ…

हिंदू पंचांगानुसार प्रत्येक मराठी महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला किंवा संकष्टी चतुर्थी म्हणतात. साधारणपणे एका वर्षात १२ आणि अधिकमास आल्यास १३ संकष्ट चतुर्थी येतात. गणपतीचे भक्त हा दिवस विशेष भक्तिभावाने साजरा करतात. गणेशाच्या उपासनेत या दिवसाचे महत्व विशेष आहे. चंद्रदर्शन हा या व्रताचा महत्वाचा भाग आहे.

संकष्ट चतुर्थीची कथा

प्रत्येक माणसाला चार प्रकारची संकटे असल्याचे मानले जाते. प्रसूतिजन्य (गर्भज), बाल्यावस्था (देहज), मरणात्मक (अंतिम) आणि यमलोकगमन (याम्यज). या चार संकटातून मुक्त होण्याकरिता गणरायांनी संकष्ट चतुर्थीचे व्रत सांगितले आहे, असा संदर्भ यामध्ये आढळतो. श्री गणेश कोशानुसार, ब्रह्मदेव पृथ्वीच्या निर्मितीकरिता ध्यानस्थ बसले असताना निर्मितीचे कार्य ध्यानी येईना. चिंताक्रांत बसलेल्या ब्रह्मदेवांना आकाशवाणीने सांगितले की, अभिमानाचा त्याग करून निर्मितीच्या कार्याला लाग. तू जो मंत्र म्हणत आहेस तो ओमकार लावून कर.

विधात्याने मंत्र म्हणायला सुरुवात करताच एक महाप्रकृती निर्माण झाली. या प्रकृतीला योगमाया असे म्हणतात. या योगमायेने श्री गणेशाची एक सहस्र वर्षापर्यंत तपस्या केली. गणेश प्रसन्न झाले. व्रतमाता तुझे नाम होईल. तुझे ठायी माझा जन्म होईल, असे वरदान गणेशांनी दिले. कालमापनाकरिता तुझी निर्मिती झाली असल्याचे विधात्यांनी तिला सांगितले. ब्रह्मदेवांची आज्ञा घेऊन तिने आपल्या कार्याला सुरुवात केली. त्यासाठी तिने तिथिरूप देह धारण केला. चार तोंडे, चार हात, चार पाय, असे तिचे वर्णन येते. तिच्यापासून सर्व तिथी निर्माण झाल्या, अशी मान्यता आहे.

गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते. हे व्रत चंद्रोदयकाली मान्य होईल, व्रतकालात जलप्राशन वा अन्नग्रहण करू नये. असे व्रत केल्यास मी संतुष्ट होऊन ऐहिक संकट निरसन करी, असे व्रत प्रत्यक्ष गणेशांनी सांगितले आहे, असे मानले जाते.

संकष्ट चतुर्थीः बुधवार, १२ फेब्रुवारी २०२०चंद्रोदयः रात्रौ ९ वाजून ५३ वाजता

संकष्ट चतुर्थी हे एक व्रत आहे. हे व्रत कोणाही करू शकते. हे व्रत दोन प्रकारांनी करतात. मिठाची संकष्ट चतुर्थी व पंचामृती चतुर्थी. या व्रतात दिवसभर उपवास करावा. उपवासानंतर झाल्यावर चंद्राला व गणपतीला महानैवेद्य दाखवावा. त्यानंतरच भोजन करावे.

संकष्ट चतुर्थी

मंगळवारी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला अंगारकी असे म्हटले जाते. अधिक मासातील अंगारकी चतुर्थी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. कारण ती एकवीस वर्षातून एकदाच येते. ३ वर्षांत ३७ महिने म्हणून ३७ संकष्ट्या; एकूण सात वार, म्हणून तीन वर्षांत अंगारकी येण्याची शक्यता असते. साधारणपणे तीन कालदर्शिका वर्षांत पाचदा अंगारकी येते. ३३ महिन्यांत एक अधिक मास येतो, म्हणजे २१ वर्षात साधारणतः सात अधिक मास येतात; अधिक मासात मंगळवारी संकष्ट चतुर्थी येण्याची शक्यता असते. साधारणपणे २१ वर्षात एकच अंगारकी अधिक मासात येते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here