फेब्रुवारी ते मार्च दरम्यान जिल्ह्यात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्येवर अंकुश लावण्यात आरोग्य विभाग यशस्वी ठरला होता. राज्यातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे टाळेबंदी जाहीर झाली. जिल्ह्यातील रुग्णसंख्या आटोक्यात होती. दरम्यान करोनामुळे नागपुर शहरातील रुग्णालये फुल झाल्यानंतर उपचार घेण्यासाठी शेकडो रुग्ण अमरावतीच्या सुपर स्पेशालीटी कोविड रुग्णालयात हलविण्यात आले. जिल्ह्यातील रुग्णांची संख्या सुध्दा झपाट्याने वाढल्याने आरोग्य यंत्रणेवर अतिरिक्त ताण आला.
नागपुरच्या रुग्णांवर यशस्वी उपचार सुरु असतांना विदर्भात अमरावती जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेविषयी विश्वास निर्माण झाला. यामुळे अकोला, वर्धा, यवतमाळ, वाशिमसह विदर्भातील इतर ठिकाणाहून मोठ्या प्रमाणत करोनाचे रुग्ण शहरात येवू लागले.
शनिवारी अमरावती जिल्ह्यातील १४ बाधितांचा मृत्यू झाला. त्याखेरीज, अमरावती जिल्ह्यात उपचारासाठी दाखल नागपूर जिल्ह्यातील २, वर्धा जिल्ह्यातील १ आणि मध्यप्रदेश मधील २ अशा ५ बाधितांचा मृत्यू झाला. एकूण १९ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळं जिल्हयाची परिस्थिती चिंताजनक झाली आहे. जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेडचा तुटवडा निर्माण झाला असताना आता रुग्णांची वाहतूक करणाऱ्या रुग्णवाहिका सुद्धा कमी पडू लागल्याने सर्वसामान्यांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times