मुंबई : दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादवर सुपर ओव्हरमध्ये विजय साकारला. या विजयासह दिल्लीच्या संघाने गुणतालिकेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीच्या संघाला धक्का दिल्याचे पाहायला मिळाले आहे.

या सामन्यापूर्वी दिल्लीचा संघ हा तिसऱ्या स्थानावर होता. दिल्लीच्या संघाने या सामन्यापूर्वी चार सामने खेळले होते, त्यामध्ये त्यांनी तीन विजय मिळवले होते. त्यामुळे सहा गुणांसह ते तिसऱ्या स्थानावर होते. पण आजच्या सामन्यात त्यांनी हैदराबादवर विजय मिळवला आणि गुणतालिकेत आरसीबीला धक्का देत दुसरे स्थान पटकावले आहे. आजच्या दिवसाच्या सुरुवातीला अव्वल स्थानावर असलेल्या आरसीबीला आता तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे.

दिल्लीच्या १६० धावांचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात चांगली झाली असली तरी त्यांना मोठी सलामी मिळाली नाही. हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर यावेळी सहा धावांवर धावचीत झाला आणि त्यांना पहिला धक्का बसला. त्यानंतर जॉनी बेअरस्टोने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि जोरदार फटकेबाजी केली. पण मोठा फटका मारण्याच्या नादात जॉनी बाद झाला. जॉनीने यावेळी १८ चेंडूंत तीन चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ३८ धावांची खेळी साकारली. जॉनी बाद झाल्यावर संघाची जबाबदारी ही केन विल्यम्सनवर आली होती. कारण जॉनीनंतर विराट सिंग आणि केदार जाधव लवकर बाद झाले. पण त्यानंतर केनने आपले अर्धशतक साकारले.

दिल्लीच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दिल्लीच्या सलामीवीरांनी यावेळी चांगली सुरुवात करत हा निर्णय योग्य असल्याचे दाखवून दिले. पृथ्वी शॉ यावेळी आक्रमक फटकेबाजी करत होता. पृथ्वी आणि शिखर धवन यांनी यावेळी ८१ धावांची दमदार सलामी दिली. पण त्यानंतर हैदराबादचा फिरकीपटू रशिद खानने धवनला त्रिफळाचीत केले आणि दिल्लीला पहिला धक्का दिला. धवनला यावेळी २८ धावा करता आल्या.

पृथ्वीने यावेळी अर्धशतकही साकारले. पण धवन बाद झाल्यावर पृथ्वी जास्त काळ फलंदाजी करू शकला नाही. यावेळी पृथ्वी आणि कर्णधार रिषभ पंत यांच्यामध्ये योग्य समन्वय पाहायला मिळाला नाही. त्यामुळेच पृथ्वी यावेळी धावचीत झाला. पृथ्वीने यावेळी ३९ चेंडूंत सात चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५३ धावांची खेळी साकारली. पृथ्वी बाद झाल्यावर काही काळ रिषभ आणि स्टीव्हन स्मिथ यांची चांगली भागीदारी पाहायला मिळाली. पंत २७ चेंडूंत ३७ धावा काढून बाद झाला. पण त्यानंतर स्मिथने फलंदाजी करत संघाला १५९ धावांपर्यंत पोहोचवले. स्मिथने यावेळी २५ चेंडूंत नाबाद ३४ धावांची खेळी साकारली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here