मुंबईः राज्यातील वाढत्या करोना रुग्णसंख्येमुळं राज्यातील आरोग्य यंत्रणांवर ताण येत आहे. करोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. तर, केंद्राकडूनही राज्यासाठी आरोग्यविषयक सुविधा पुरवण्यात येत आहेत. मात्र, केंद्राकडून राज्याला होणारी मदत ही अपुरी असल्याचं सरकारमधील मंत्र्यांकडून सांगण्यात येत आहे. तर, एकीकडे महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी सरकारचा हा दावा फेटाळून लावला आहे. राज्यातील विरोधी पक्षनेते यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. तसंच, केंद्र सरकार पूर्ण मदत करत आहे त्यामुळं त्यांनी रोज सकाळी उठून कांगावा बंद करावा, असा टोला फडणवीसांनी लगावला आहे. फडणवीसांचा कोणावर रोख आहे याबद्दल चर्चा सुरु झाली आहे.

‘केंद्र सरकारने सोळा लाखांपैकी १० दिवसांकरिता ४ लाख ३५ हजार रेमेडेसिवीर राज्याला दिलेत. सर्वात मोठा कोटा महाराष्ट्राला मिळाला आहे. ऑक्सिजनसंदर्भात केंद्रानं सतराशे मेट्रिक टन उपलब्ध करुन दिला आहे. पण जे बोलघेवडे लोक केंद्र सरकारला बोलतात त्यांना सांगू इच्छितो इतर राज्यांपेक्षा अधिक कोटा केंद्र सरकारने दिला आहेत. आजही एअर फओर्सच्या माध्यमातनं केंद्रानं राज्याला सुविधा पुरवल्या आहेत,’ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच, जे कांगावाखोर आहेत त्यांना माझी एकच विनंती आहे. केंद्राची सरकारला पूर्ण मदत आहे त्यामुळं त्यांनी रोज सकाळी उठून कांगावा बंद करावा,’ असा खोचक टोला फडणवीसांनी लगावला आहे.

‘लसीकरणात एकवाक्यता हवी’

”मन की बात’मध्ये पंतप्रधानंनी स्पष्ट केलंय की प्रत्येक व्यक्तीला केंद्र सरकार मोफत लसीकरण उपलब्ध करुन देणार. राज्यांवर याचा भार नाहीये. खासगी अस्थापना आहेत त्यांना लसीकरण करण्याची इच्छा असेल तर ते लस विकत घेऊ शकतात. पण, राज्य सरकारकडून वेगवेगळे वक्तव्य का केले जातात, ट्वीट केले जातात व ते डिलीट का केले जातात? हे मला माहित नाहीय,’ असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

‘१ तारखेपासून आपल्याला लसीकरणाची पद्धत बदलायला हवी. कारण आता मोठ्या संख्येने लोक यात सामील होणार आहेत. त्यामुळे थोडी अव्यवस्था होण्याची शक्यता आहे. गर्दी होण्याची शक्यता असल्याने राज्य सरकारने त्यासाठी धोरण आखायला हवे,’ असे फडणवीस यांनी सांगितले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here