नागपूर: रेमडेसिव्हिरची काळाबाजारात विक्री करणाऱ्या आणखी एका टोळीचा प्रतापनगर पोलिसांनी पर्दाफाश केला. किग्सवे हॉस्पिटलमधील दोन वॉर्ड बॉयसह तिघांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली. सूत्रधार निखिल बळवंत डहाके (वय २६ रा. समुद्रपूर, जि.वर्धा), दीपक श्रीराम महोबिया (वय २७ ) व संजय शिवपाल यादव (वय २८ दोन्ही मूळ रा. पाधार, जि.बैतुल ,सध्या रा.उप्पलवाडी), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक व संजय हे किग्स वे हॉस्पिटलमध्ये गत सात महिन्यांपासून वॉर्ड बॉय म्हणून काम करत आहेत. निखिल याचे बीएससीपर्यंत शिक्षण झाले आहे. त्याची बहीण व जावई वर्धा मार्गावरील एका हॉस्पिटलमध्ये काम करतात. दीपक हा निखिल याच्या जावयाचा मित्र आहे. त्यामुळे निखिल याची दीपकसोबत ओळख झाली. नागपुरात रेमडेसिव्हिरची प्रचंड मागणी असल्याने ते अधिक किंमतीत विकण्याचा कट निखिल याने आखला. यासाठी त्याने दीपक याची मदत घेतली.

एक ३० हजार रुपयांना विकून दहा हजार रुपये निखिल हा स्वत:कडे ठेवायचा. निखिल हा रेमडेसिव्हिरचा काळाबाजार करीत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त नुरूल हसन यांना मिळाली. हसन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त पी.एम.कार्यकर्ते यांच्या नेतृत्वात प्रतापनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनकर ठोसरे, निरीक्षक (गुन्हे)अमर धंदर, सहाय्यक निरीक्षक संतोष बोवणे, उपनिरीक्षक एस.ई.बारगळ, सहाय्यक उपनिरीक्षक अनिल ब्राह्मणकर, हेडकॉन्स्टेबल दिनेश बावनकर, शिपाई किरण, मोना चक्रवर्ती व रोशनी यांनी आयटी पार्कजवळील बिग बाजारसमोर रविवारी सायंकाळी सापळा रचला. निखिल याच्यासोबत संपर्क साधला. ३० हजार रुपयांमध्ये निखिल याने रेमडेसिव्हिर देण्याचे मान्य केले. त्याने पोलिसांकडून दहा हजार रुपये घेतले. त्यांनतर दोन तासांनी निखिल हा रमेडेसिव्हिर घेऊन आला. पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडून इंजेक्शन जप्त केले. त्यानंतर पोलिसांनी दीपक व संजयलाही अटक केली. या दोघांकडून दोन मोटरसायकली व ५४ हजार रुपयांची रोख जप्त केली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here