डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक संदीप जाधव यांना रॉय यांच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, रॉय यांचे येरवडा आणि विश्रांतवाडी या ठिकाणी क्लिनिक होते. ते गितिका आणि त्यांचा भाऊ संजय (वय ६०) यांच्यासोबत राहात होते. ते दोघेही अविवाहित होते. डॉ. रॉय हे मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या आपल्या भावंडांची काळजी घेत होते. डॉ. राय आणि त्यांची बहीण गितिका यांच्या करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
रॉय यांना करोना संसर्ग झाल्याचे त्यांना आधीच माहिती होते का? याची महिती घेत आहोत. फ्लॅटमध्ये पाहणी केली असता, तिथे करोना चाचणीचा अहवाल कुठेही आढळून आला नाही. या घटनेची नोंद केली असून, तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.
डॉ. रॉय यांचा मृत्यू तीन ते चार दिवसांपूर्वीच झाल्याची शक्यता आहे, असे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. बंद फ्लॅटमधील बाथरूममध्ये त्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्यांच्या बहिणीचीही प्रकृती चिंताजनक होती. त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पुण्यात राहत असलेल्या काही नातेवाइकांनी डॉ. रॉय यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, काही प्रतिसाद मिळू शकला नाही. अखेर शनिवारी त्यांनी फ्लॅटवर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते फ्लॅटवर गेले. त्यांनी दरवाजा ठोठावला. पण आतून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर त्यांनी पोलिसांना कळवले. पोलीस त्या ठिकाणी आले. त्यांनी अग्निशमन दलालाही पाचारण केले. फ्लॅटच्या बेडरुमचा दरवाजा आतून बंद होता. बाथरूममध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times