‘रेमडेसिव्हिर इंजेक्शनची रुग्णांना दोन ते तीन तासांत डिलिव्हरी मिळेल,’ असा मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा मेसेज व्हायरल करणाऱ्या मोबाइलधारक व बँक खाते धारकाविरोधात नगर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करोना रुग्णांना उपचारासाठी आवश्यक रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर आर्थिक फसवणुकीच्या उद्देशाने रेमडेसिव्हिर इंजेक्शन देण्याचे आमिष दाखविले जात आहे. अशा मेसेजच्या माध्यमातून लोकांची फसवणूक होऊ नये, यासाठी भाजपचे सुवेंद्र गांधी यांनी हा प्रकार पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या निदर्शनास आणून दिला. अधीक्षक पाटील यांनी तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर गांधी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.
आतापर्यंत अशा प्रकारे फसवणूक झाल्याची घटना घडली नाही. याबद्दल सायबर पोलिसांनी सांगितले की, सध्या सोशल मीडियावर ‘ करोना रुग्णांसाठी रेमडेसिव्हिर इंजेक्शनची गरज आहे का? दोन ते तीन तासांत घरपोच मिळेल. त्याबरोबर संपर्क क्रमांक दिला आहे. तसेच बँक खाते क्रमांक आणि बँकेचे नाव, पॅन कार्ड क्रमांक, तसेच गुगल पे, फोन पे, भीम अॅप, नेट बँकिंग अॅपच्या माध्यमातूनही पैसे अदा करू शकता,’ अशा आशयाचा मेसेज व्हायरल होत आहे. त्यामुळे नागरिकांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. रेमडेसिव्हिर इंजेक्शन ऑनलाइन विक्री करण्यास प्रतिबंध घातले आहेत. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रलोभनांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times