महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील कटगाव टाडा या गावातील १०५ वर्षांचे आजोबा आणि ९५ वर्षांच्या आजीबाईंना करोना संसर्गाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या वृद्ध दाम्पत्यांचे वय पाहता गावकऱ्यांनी व नातेवाईकांनीही आशा सोडली होती. मात्र, या आजी- आजोबांनी करोनावर यशस्वी मात केली आहे.
धेनु चव्हाण व मोटाबाई चव्हाण असं या वृद्ध दाम्पत्याचं नाव आहे. त्यांना करोनाची लागण झाल्यानंतर विलासराव देशमुख इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथं त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. जवळपास ९ दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
वाचाः
करोनाची लक्षण जाणवायला लागल्यानंतर लगेच उपचार घेतल्यास धोका टळला व करोनावर मात करणं शक्य झालं, असं चव्हाण दाम्पत्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं आहे.
आम्ही एकत्रित कुटुंबात राहतो. २४ मार्चला माझ्या आई- वडिलांना आणि तीन मुलांना करोनाची लागण झाली. आई- वडिलांना ताप आला तर तर, वडिलांच्या पोटात दुखत होतं. म्हणून मी तातडीने दोघांना रुग्णालयात दाखल केलं. गावापासून तीन किलोमीटर अतंरावर असलेल्या सरकारी रुग्णालयात त्यांना बेड मिळाला, असं त्या दाम्पत्याचा मुलगा सुरेश चव्हाण यांनी सांगितलं आहे.
वाचाः
करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर दोघंही खूप घाबरले होते. त्यामुळं त्यांच्यावर घरात उपचार करणं शक्य नव्हतं आणि त्यांच्यावर घरात उपचार करण्याचा निर्णय घेणंही चुकीचं ठरलं असतं. म्हणून आम्ही त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. अवघ्या ९ दिवसांतच ते ठणठणीत बरे झाले आहेत, असंही सुरेश यांनी सांगितलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times