करोनामुळं राज्यातील अवस्था बिकट झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळं आरोग्य प्रशासनावरील ताणही वाढत आहे. त्यामुळं २२ एप्रिल रोजी सरकारने कडक लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यावेळी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व शासकीय कर्मचाऱ्यांनाच लोकल, मेट्रो, मोनो प्रवासाची मुभा देण्यात आली होती. याशिवाय खासगी प्रवासासाठी जिल्हा बंदीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, तरीही राज्यातील काही भागांत रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याचं चित्र आहे.
रुग्णसंख्या वाढीबरोबरच ऑक्सिजनचा तुटवडा, बेडची कमतरता अशी अनेक आव्हानं आरोग्य यंत्रणेसमोर आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाऊन पुन्हा वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ठाकरे सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तसं विधानही केलं आहे. ‘मुंबईत नव्या करोनाबाधित रुग्णांची टक्केवारी घटली आहे. मात्र, राज्यातील इतर भागात अजूनही करोनाचा संसर्ग आहे. रुग्णांमध्येही वाढ होत आहे. त्यामुळं उद्या होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत लॉकडाऊन संदर्भात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात येईल,’ अस विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times