यंदा जिल्ह्यात गव्हाच्या पिकाला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. पावसाने झोडपलेल्या गव्हाचा रंग उडून प्रत खराब झाली आहे. यातच टाळेबंदीमुळे शेतकऱ्यांचे पेरणी ते काढणीचे नियोजन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गव्हाची लागवड करण्यात येते. मोर्शी, वरुड, अंजनगांव, अचलपूर, चांदुर बाजार, तिवसा तालुक्यात मोठ्या प्रमाणत गव्हाची लागवड करण्यात येते. यंदा शेतकऱ्यांवर टाळेबंदीमुळे अनिश्चीततेचे सावट होते. त्यातच आलेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणत गव्हाचे नुकसान झाले.
फेब्रुवारी ते मार्च दरम्यान जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढत असतांना जिल्हाअंतर्गत टाळेबंदी घोषीत करण्यात आली होती. शेतमजुरीच्या कामासाठी मध्यप्रदेश, भैसदही, मेळघाट, धारणी सारख्या दुर्गम भागातून आलेले कुशल मजूर होळीसाठी गावी गेले. परतीच्या प्रवासात असतानाच राज्यस्तरावरुन टाळेबंदी घोषीत करण्यात आली. यामुळे शेती कामात कुशल असणाऱ्या मजुरांची गहू कापणीच्या हंगामात चणचण भासू लागली.
स्थानिक मजूर कांदा काढणीच्या कामात व्यस्त असतांना दुर्गम भागातून आलेल्या काही कुशल कामगारांनी गहू कापणीचे दर वाढवले. कापलेला गहू तात्काळ काढण्यासाठी वापरण्यात येणारे ट्रॅक्टर मशीन व हार्वेस्टर मालकांनी पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे गहू काढणीचे दर वाढविले. अवकाळी पावसामुळे आधीच गव्हाची प्रतवारी खालावली आहे. बाजारात गव्हाची किंमत, पेरणी ते काढणीच्या खर्चाची ताळेबंदी केल्यास ‘बेरीज वजाबाकी एक’ झाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच आली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times