‘देशातील परिस्थिती गंभीर आहे त्याचे कारण काही राज्यांनी चाचण्याच केल्या नाहीत. त्यामुळं करोनाच्या लाटा उसळल्या. आता पश्चिम बंगालमधील आकडे समोर यायला लागले आहेत. महाराष्ट्रात गावपातळीवर करोना संदर्भातील यंत्रणा आहे ती राबवली जातेय याकडे मुख्यमंत्री लक्ष ठेवून आहेत. आतापर्यंत आपण अनेक मॉडेल आपण बघितले पण ‘मुंबई मॉडेल’ व ‘महाराष्ट्राचे मॉडेल’ ज्या पद्धतीने काम करतेय मुख्यमंत्री जसं काम करतात तसं देशाला काम करावं लागेल,’ असं संजय राऊत म्हणाले आहेत.
‘कोणत्याही युद्धात सेनापती हा प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन लढत नाही. तो वॉररुममध्ये बसून विजय मिळवून देतो. उद्धव ठाकरे यांनीही एकाच ठिकाणी बसून अगदी गावपातळीपर्यंत सर्व उपाययोजना राबवल्या जात आहेत की नाही, हे पाहिले. त्यामुळे राज्यातील कोरोना आटोक्यात आणण्याचे श्रेय त्यांना दिलेच पाहिजे. विरोधकांनी आता टीका करणे बंद करावे,’ असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
‘मुंबईसारख्या ठिकाणी रुग्णसंख्या निम्मावर आहे. मुंबईत लॉकडाऊननंतर जी संख्या वाढत होती ती कमी होतेय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं २४ तास काम चाललं आहे. प्रत्येक गावात, घरात काय होतंय याची ते माहिती घेत आहे. करोना रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्याचे काम सुरु आहे. आरोग्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सरकारमधील लोक हे सर्व ताकदीने काम करत आहेत,’ असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
करोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सरकार करत आहे. आरोग्य यंत्रणांवर मोठा ताण आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बदनामी होत आहे. हे खरं आहे. पण हा कंलक दूर करायला हवं भारताला पुन्हा उभं राहायचं आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. तसंच, करोना संकटामुळं देश २० वर्ष मागं गेला आहे अनेक यंत्रणा कोलमडून पडल्या आहेत. अनेकांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागेल, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times