म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूरः देशात सर्वात चांगला असलेल्या गोकुळ दूध संघात इतरांची घुसखोरी होऊ नये, हा संघ भविष्यातही चांगलाच चालावा यासाठीच स्वाभिमानी शेतकरी संघटना सत्ताधारी शाहू आघाडी सोबत राहण्याची घोषणा माजी खासदार यांनी केली. राज्यात सोबत असणाऱ्या शेट्टींनी येथे मात्र महाविकास आघाडीच्या विरोधात भूमिका घेतल्याने जिल्ह्यातील राजकारणाला कलाटणी मिळाली. एफआरपीच्या प्रश्नावर काहीही करू शकतो असे सांगत त्यांनी राज्यातील महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा इशाराच दिल्याने राजकारणाला वेग येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जिल्ह्याचे अर्थकारण अवलंबून असणाऱ्या गोकुळ ची निवडणूक दोन मे रोजी होत आहे. या निमित्ताने जिल्ह्यात राजकीय उलथापालथ जोरात सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शेट्टी व आजरा कारखान्याचे चेअरमन अशोक चराटी यांनी सत्ताधारी आघाडीसोबत असल्याची घोषणा केली. शेट्टी म्हणाले, ‘गेल्यावर्षी लॉकडाऊनच्या काळात गोकुळने उत्पादकांना मोठा आधार दिला. उत्पादकांना राज्यात सर्वाधिक दर हा संघ देतो. इतर संघ लिटरला १४ रूपये दर देताना या संघाने २७ रू दिले. आम्ही टीका करताना चांगल्याला चांगलंही म्हणतो. संघ चांगला चालवला आहे, म्हणूनच आम्ही सोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यात हा संघ मल्टिस्टेट करणार नाही असा शब्दही सत्ताधाऱ्यांनी दिला आहे.

माजी खासदार धनंजय महाडिक म्हणाले, ‘देशात वैभवशाली असलेल्या ‘गोकुळ’ला बदनाम करण्यासाठी, संघ बंद पाडण्यासाठी जिल्ह्यातील मंत्री, खासदार आणि आमदारांची अभद्र युती झाली आहे, संघाचा राजकीय अड्डा करू पाहणाऱ्या या युतीचा डाव सभासदच हाणून पाडतील’. महाडिक म्हणाले, ‘शेतकऱ्यांचा विश्वासू ब्रँड म्हणून शेट्टी यांची ओळख आहे. आमदार पी.एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक व अरूण नरके हे सहकारातील ब्रँड आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली गोकुळची वाटचाल सुरू आहे. देशात ४५० कोटींच्या ठेवी असलेला एकमेव गोकुळ हा एकमेव संघ आहे. महिन्याला तीन वेळा बिल देणारा आणि चाळीस वर्षात एकदाही संकटाच्या काळातही बिलाची तारीख न चुकविणारा हा संघ आहे. कुणावर उपकार म्हणून नव्हे तर शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे देणारा हा संघ आहे. हा संघ टिकला पाहिजे यासाठीच आम्ही ताकदीने निवडणुकीत उतरलो आहोत आमचा विजय निश्चित आहे, हे सांगायला कोणत्याही जोतिषाची गरज नाही’.

चारशे कोटींच्या ठेवी असलेल्या देशातील कोणताही संघ दाखवा असे आव्हान देत आमदार पी.एन. पाटील म्हणाले, ‘करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ४१ हजार संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. पण, विरोधकांनी गोकुळची निवडणूक लादली. यामुळे दोन मतदारांचा बळी गेला. अनेकजण करोना बाधित झाले आहेत. पीपीई किट घालून मतदान करण्याची वेळ आली आहे. मग या निवडणुकीची गरज होती का?’ निवडणूक पुढे जाण्यासाठी आम्ही न्यायालयात गेल्याचा विरोधकांचा आरोप खोटा आहे. निवडणूक घेऊ नका म्हणून आम्ही नव्हे तर विरोधकांच्या संस्थानी याचिका दाखल केली होती. आमचा विजय निश्चित आहे, आत्मविश्वास आमच्यात नक्की आहे, तो आता आणखी वाढला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here