चाकणकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, ‘खासदार सुजय विखे डॉक्टर आहेत. डॉक्टरांना जीवाचे मोल असते. मानवतेच्या भावनेतून विखेंनी कुठे लस मिळते ते सांगावे, याचा फायदा सर्वांनाच होईल. नगर जिल्हा हा महाराष्ट्रातच आहे. आमच्याकडेही लोक इंजेक्शनबद्दल विचारतात. तुम्ही आम्हालाही रेमडेसिवीर कसं आणायचं हे सांगाल ही अपेक्षा आहे.’, असं चाकणकर यांनी म्हटलं आहे. तर, दुसऱ्या एका ट्विटमध्ये चाकणकर यांनी म्हटले आहे, ‘खासदार विखे यांनी आणलेली दहा हजार ‘रेमडेसिविरची इंजेक्शन’ आणि सन्माननीय पंतप्रधान मोदीसाहेबांचा ‘विकास’ यामध्ये एकच साम्य आहे, ते म्हणजे दोन्हीचे लाभार्थी अजून कुणालाच दिसले नाहीत. तब्बल दहा हजार इंजेक्शनच्या बाबतीत संशय निर्माण झाल्याने या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी व्हावी व सत्य समोर यावे हीच आमची भूमिका आहे.’, असा टोला चाकणकर यांनी लगावला आहे.
डॉ. विखे यांनी दिल्लीहून खासगी विमानातून रेमडेसिविर इंजेक्शन्स आणून नगर जिल्ह्यातील रुग्णालयांना दिली. त्यांनी स्वत:च तसा एक व्हिडिओ प्रसारीत केला. यावर चाकणकर यांनी शंका घेऊन ही बॉक्समध्ये नेमके काय आणले, इंजेक्शन आणली असतील तरी ती कोठून आणली, कोणाला वाटली हे जाहीर करावे, अशी मागणी केली होती. विखे यांनी या प्रश्नांची उत्तरे देणारा व्हिडिओ करून जनतेची चेष्ठा करणे थांबवावे, असे चाकणकर यांनी म्हटले होते. डॉ. विखे यांनी चाकणकर यांचे नाव न घेता उत्तर दिले होते. आपण केवळ जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना बांधिल आहोत. जिल्ह्याबाहेरील व्यक्तीला उत्तर देण्याची गरज नाही, असे म्हटले होते. मधल्या काळात या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिकाही दाखल झाली आहे. त्यानंतर चाकणकर यांनी पुन्हा या विषयावर भाष्य केले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times