दिग्दर्शक राम गोपाल वर्मा त्यांच्या परखड बोलण्यासाठी ओळखले जातात. देशात करोनामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यावर राम गोपाल वर्मा यांनी नेमके भाष्य आपल्या ट्विट मधून केले आहे. त्यांनी लिहिले आहे की, ‘ करोना परिस्थिती योग्य प्रकारे न हाताळल्याबद्दल सर्व वृत्तवाहिन्या नरेंद्र मोदी यांना वगळून प्रत्येकाची मुलाखत कशी काय घेऊ शकतात?’
त्यांनी उपस्थित केलेला हा प्रश्न सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेक लोकांनी त्याच्या ट्विटवर कमेंट्स केल्या आहेत. काही युझरने राम गोपाल वर्मा यांच्यावर टीका केली आहे तर काहींना त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे समर्थन केले आहे.
याही आधी राम गोपाल वर्मा यांनी हरिद्वार येथे भरवण्यात आलेल्या कुंभमेळ्यावर टीका केली होती. त्यावेळी त्यांनी ट्विट केले होते. त्यामध्ये त्यांनी म्हटले होते की, ‘तुम्ही जो पाहात आहात तो कुंभमेळा नाही तर एक अॅटम बॉम्ब आहे. मला उत्सुकता वाटतेय की, आता या व्हायरल एक्सप्लोजनसाठी कोणाला जबाबदार धरलं जाणार आहे.’ हे ट्विट करताना त्यांनी कुंभमेळ्याचा फोटोही शेअर केला होता.
दरम्यान यापूर्वीही अनेक हिंदी मराठी कलाकारांनी देशातल्या सद्यस्थितीवर भाष्य केले आहे. अभिनेता फरहान अख्तरने लसींच्या वाढत्या किमतीवर भाष्य केले होते. सोमवारी फरहानने एक बातमी शेअर केली होती.
भारत सरकार १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण खुले करणार असल्याने सरकारने सीरम आणि भारत बायोटेक या लस उत्पादक कंपन्यांना लसीचे दर कमी करायला सांगितल्याची ती बातमी होती. त्यावरून फरहान बराच ट्रोलही झाला होता. फरहानबरोबर यासंदर्भात अभिनेता सोनू सुद यानेही या किंमतीवर प्रश्न उपस्थित केला होता.
दिग्दर्शक केदार शिंदे यांनीही आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. यात ते म्हणतात, ‘टीव्हीला बाईट देणा-या नेत्यांच्या मागे एवढी गर्दी असते, त्यांना लॉकडाऊनचा नियम नाही का? आणि हवाय कशाला एवढा फौजफाटा? कुणाला दाखवायचा आहे? किंवा मला वाटते, एवढीच मंडळी आता त्यांच्यासोबत उरली असावीत!’
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times