गेल्याकाही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात लसीचा तुटवडा भासत आहे. आजही मुंबई- पुण्यासह अनेक लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध नसल्यानं अनेक नागरिकांना माघारी परतावं लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांनी १ मेपासून सुरु होणाऱ्या लसीकरणाबद्दल चिंता व्यक्त केली होती. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण मोफत करण्याची घोषणा राज्य सरकारनं केली आहे. मात्र, लसीच्या कमतरतेमुळं १मे पासून लसीकरण सुरु होणार नसल्याचं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, ४५ वर्षांच्या वयोगटातील राष्ट्रीय लसीकरणाचा कार्यक्रम सुरुच राहिल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
‘लस आज आपल्याला लगेच उपलब्ध होत नाहीय. त्यामुळं १ मेपासून लगेचच लसीकरण सुरु होणार नाही, १८ – ४४ वयोगटातील लोकांना विनंती आहे की त्यांनी सबुरीनं घ्यावं लागेल. लसीच्या कमतरतेमुळं १ मेपासून लसीकरण शक्य नाही,’ असं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
‘१८ ते ४४ वयोगटातील ५ कोटी लोकांचं लसीकरण एकाच वेळी करणं शक्य नाही. त्यामुळं एका समितीची स्थापना करण्यात येणार आहे. ही समिती एक मायक्रोप्लानिंग करणार आहे. त्यामध्ये वयोगटानुसार लसीकरण राबवण्याची चर्चा करण्यात येईल. १८- ४४ वयोगटासाठी वेगळी लसीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. तिथं फक्त याच वयोगटातील लोकांचं लसीकरण करण्यात येईल,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.
कोविन अॅपवरुन रजिस्टर
‘लसीकरणासाठी जाताना कोविन अॅप वापरुन रजिस्टर करुन मगच केंद्रावर जावं. जे लसीकरण होईल ते कोविन अॅपच्या माध्यमातूनच होईल. या वयोगटातील नागरिकांनी कोविन मोबाईल अॅपवर नोंदणी करावी, कुठेही लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये
,’ असंही आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
लसीकरणाला वेग द्यायचा आहे
‘साधारणपणे आपण ६ महिन्यांत हा लसीकरणाचा कार्यक्रम पूर्ण करायचा आहे. त्यासाठी १२ कोटी डोस लागतील. त्यानुसार महिन्याला २ कोटी डोस द्यावे लागतील. ही राज्य शासनाची क्षमता आहे. १३ हजार संस्था आरोग्य विभागाच्या आहेत. त्यामुळे राज्यात रोज १३ लाख लसीकरण करता येऊ शकेल. महाराष्ट्र देशात सर्वात कमी लसी वाया जाण्याचं प्रमाण आहे. सध्या राज्यात १ टक्के लसी वाया जाण्याचं प्रमाण असून देशातल्या ६ टक्के या प्रमाणापेक्षा ते कमी आहे,’ असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times