म. टा. प्रतिनिधी, नगरः दिल्लीहून खासगी विमानाने आणलेले नगरचे खासदार डॉ. यांनी आता या विषयावर बोलणेही सोडून दिले आहे. त्याऐवजी आता ऑक्सिजन उपलब्ध करण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले असून त्यांच्या विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलमध्ये सुमारे दीड कोटी रुपये खर्चाचा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प ते उभारत आहेत. रेमडेसिवीरबद्दल प्रश्न विचारल्यावर त्यांनीच ही माहिती पत्रकारांना दिली.

डॉ. विखे यांनी आणलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा मुद्दा सध्या गाजत आहे. असे असले तरी जिल्ह्यातील तुटवडा कायम आहे. यासंबंधी विखे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले की, ‘रेमडेसिवीरबद्दल आता मी काही बोलणार नाही. मी ही इंजेक्शन आणल्यावर त्याचे काय झाले ते तुम्हाला माहिती आहे. आता ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन त्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. आम्ही विखे कुटुंबियांनीच आता हा प्लांट उभारण्याचे ठरविले आहे. त्यासाठी कंपनीशी करार झाला, पैसेही भरले. दोन-तीन दिवसांत चीनहून कंपनीचे साहित्य येईल. जगातील प्रसिद्ध कंपनीची सामुग्री अत्याधुनिक असून कमी दिवसात ती जोडली जाते. त्यामुळे येत्या दहा दिवसांत विळद घाटातील आमच्या हॉस्पिटलमध्ये हा प्रकल्प सुरू होईल,’ असं विखेंनी म्हटलं आहे.

‘इंजेक्शनपेक्षा ऑक्सिजन महत्वाचा असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्या ऑक्सिजन उपलब्धतेवर भर दिला आहे. त्यामुळे भाजपचा खासदार या नात्याने यासाठी हातभार लावण्याचे समाधान मला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्च येणार आहे. भारतात प्रथमच असा जलद सुरू होणारा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यातून आमच्या हॉस्पिटलची गरज भागवून उरलेला ऑक्सिजन जिल्हा सरकारी रुग्णालयाला दिला जाणार आहे,’ असेही विखे यांनी सांगितले.

लॉकडाउनसंबंधी ते म्हणाले की, ‘याचे निर्बंध कडक हवेत. तज्ज्ञांनी योग्य नियोजन केले पाहिजे. सकाळी सात ते अकरा सवलत देणे चुकीचे आहे. या काळात गर्दी होत असल्याने दिवसभराचा संसर्ग या काळात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचे नीट नियोजन करण्याची गरज आहे,’ असेही विखे म्हणाले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here