सोलापूर: जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांच्या शोधाला आज २०२ वर्षे पूर्ण झाली आहेत. या लेण्यांकडे आज अवघं जग आकर्षित होत आहे. बौद्ध संस्कृती जगाला सांगणारा हा ऐतिहासिक वारसा पुढील कैक पिढ्यांसाठी दिशादर्शक ठरणार आहे. या लेण्यांचा शोध आजच्याच दिवशी २८ एप्रिल १८१९ रोजी जॉन स्मिथ या ब्रिटिश अधिकाऱ्याने लावला. या लेण्यांच्या शोधामागची कहाणीही मोठी रंजक आहे.

ब्रिटिश सैन्याची एक तुकाडी शिकारीच्या शोधात अजिंठा लेण्यांच्या परिसरातील जंगलात फिरत होती. त्यावेळी शिकारीच्या मागावर असलेल्या जॉन स्मिथ यांना एक वाघ जंगलातील गुहेत जाताना दिसला. तेव्हा स्मिथ ही त्याच्या मागोमाग त्या गुहेत गेले असता गुहेतील कलात्मक सौंदर्य पाहून आश्चर्याचा धक्का बसला. हजारो वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या मानवी संस्कृतीचा हा ठेवा होता. त्यानंतर स्मिथ यांनी या लेण्यांच्या लेणी क्रमांक १०च्या खांबावर आपलं नाव आणि तारीख लिहिल्याचे अस्पष्ट पाहायला मिळते. भारतातील बौद्ध धर्माची पिछेहाट झाल्यामुळेचं ही लेणी दुर्लक्षित राहिली होती.

स्मिथ यांच्या शोधानंतरही याठिकाणी काही काम झाले नाही. फक्त कंपनीच्या सरकार दरबारी नोंद, अभ्यास आणि अहवाल तयार झाले. पुढे १८४४ साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने कॅप्टन रॉबर्ट गिल या चित्रकलाप्रेमीची लेण्यांच्या संरक्षणासाठी नेमणूक केली. गिल हे स्वतः चित्रकार असल्याने त्यांनी येथील झाडे झुडपे तोडली, स्वछता केली. वानरं, वटवाघळे हकाळली, रस्ता केला त्यामुळं बौद्ध धर्माचा दैदिप्यमान ठेवा जगासमोर आला. गिल यांनी येथील चित्रांच्या प्रतिकृती स्वत: काढल्या. अजिंठ्यावरचा दुर्मिळ असा चित्रग्रंथ आजही डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ग्रंथालयात अभ्यासासाठी आजही उपलब्ध आहे.अशाप्रकारे एक मौलिक ठेवा जगाच्या समोर आला त्याला आज २०२ वर्षे पूर्ण झाली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here