म. टा. प्रतिनिधी, : परिसरात राहणाऱ्या कनीज फातेमा शेख जावेद अख्तर या अकरा वर्षीय बालिकेचा मृत्यू कुपोषणामुळे झाल्याचे समोर आले आहे. गेल्या दोन वर्षांपासून कनीजला सतत मारहाण करून पुरेसे जेवण दिले जात नव्हते. तसेच तिला अंघोळ करू दिली जात नव्हती. तिला शारीरिक व्याधी जडवण्यास तिचे आई-वडील कारणीभूत असल्याने तिचा मृत्यू झाला. त्यामुळे बुधवारी रात्री उशिरा दुर्दैवी कनीजच्या आईवडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

जळगावातील पिंप्राळा हुडको येथील राहत्या घरीच कनीजचा मृत्यू झाला होता. तिच्या आई-वडीलांनी कुणालाही काहीही न सांगता दुसऱ्याच दिवशी सकाळी तिचा मृतदेह दफन केला. त्यानंतर दोघे बेपत्ता झाले होते. या सर्व प्रकरणाचा संशय आल्यानंतर कनीजचा मामा अजहर व आजी-आजोबा यांनी पोलिसांत तक्रार केली. बुधवारी कनीजचा मृतदेह बाहेर काढून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. वैभव सोनार यांच्यासह पथकाने मृतदेहाचे विच्छेदन केले. दरम्यान, कनीजच्या पोटात अन्न-पाणी नव्हते. कुपोषण, भुकेमुळे तिचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक कारण समोर आले.

दरम्यान, कनीजची आई, नाजीया परवीन हिला विश्वासात घेऊन पोलिसांनी विचारणा केली होती. तिने दिलेल्या जबाबानुसार, कनीजच्या जन्मानंतर तिच्या आजीचा (जावेद अख्तरची आई) हृदयविकाराने मृत्यू झाला. यानंतर दोन वर्षांवी जावेदच्या मेडिकल दुकानास आग लागून मोठे आर्थिक नुकसान झाले. या घटनांमुळे जावेद याने कनीजला अपशकुनी असल्याचा समज करून घेतला. तेव्हापासून तो कनीजला मारहाण करीत होता. कनीजला पुरेसे जेवण दिले जात नव्हते. तिला घरातून बाहेर निघू देत नव्हता. तिच्या पाठीत कुकर मारून फेकल्यामुळे तिला दुखापत झाली. त्यामुळे तिला नीटपणे उभे राहता येत नव्हते. तिला बाथरुममध्येही जाता येत नव्हते. अशाही परिस्थितीत जावेद याने तिच्या पायावर मारहाण केली. तसेच १५ दिवसांपासून तिला जवेण न देता डांबून ठेवले. अशाच अवस्थेत तिला मारुन टाका असे जावेदने पत्नीला सांगितले होते. त्यामुळे कनीजला कोणीही जेवण दिले नाही. अखेर २३ रोजी तिचा मृत्यू झाला. यांनतर तिला दफन करून जावेद व त्याची पत्नी जळगावातून बेपत्ता झाले होते. हे प्रकरण पोलिसांत गेल्यानंतर चौकशीअंती हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला.

या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक दीपक बिरारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कनीजचे वडील जावेद व आई नाजीया परवीन यांच्या विरुद्ध कलम ३०४, ३२३, ५०६, २०१, २०२, ३४ व बाल न्याय (मुलांची काळजी व संगोपन) अधिनियम २०१५ चे कलम ७५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here