करोनासंसर्ग थोपवण्यात महत्त्वाचे अस्त्र असणाऱ्या सरसकट लसीकरणाची नागरिक वाट पाहत आहेत. मात्र, लसीच्या तुटवड्यामुळं मुंबईत अनेकांना लसीपासून वंचित राहावं लागत आहे. मुंबईतील अनेक लसीकरण केंद्रावर आज लस उपलब्ध नसल्यानं अनेक नागरिकांना लसीकरण केंद्रावरुन माघारी फिरावे लागले होते. याच पार्श्वभूमीवर सुरेश काकाणी यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबईत पुढचे तीन दिवस लसीकरण बंद राहणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे. तसंच, रविवारपर्यंत नवीन पुरवठ्याबाबत निश्चित माहिती मिळेल.
लस उपलब्ध होताच नोंदणी केलेल्या नागरिकांना मेसेज पाठवण्यात येईल व पुन्हा लसीकरण सुरु केलं जाईल. मात्र, तोपर्यंत लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. मुंबईसाठी ७६ हजार डोस मिळाले आहेत. त्यापैकी ५० हजार आज दुपारपर्यंत संपले. उरलेले दिवसभरात संपतील. त्यामुळं साठा मिळेपर्यंत लसीकरण बंद ठेवण्याच येणार आहे. शुक्रवारी साठा मिळण्याची शक्यता कमी आहे, असंही सुरेश काकाणी यांनी म्हटलं आहे.
नागरिकांनी आधी कोविन अॅपवर नोंदणी करावी किंवा संकेतस्थळावर नोंदणी करावी आणि मगच दिलेल्या तारखेला केंद्रावर जाऊन लस घ्यावी. यामध्ये ज्यांनी नोंदळी केली आहे ज्यांचा दुसरा डोस आहे अशाच नागरिकांना लसीकरणासाठी प्राधान्य दिलं जाईल, असंही ते म्हणाले आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times