देशात सलग १० दिवसांपासून करोनाचे रोज ३ लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळून येत आहेत. शुक्रवारी ही संख्या वाढून ३.८६ लाखांवर गेली. रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. देशात ऑक्सिजन, औषधं आणि उपचारासाठी आवश्यक वस्तूंच्या तुटवड्याचा सामना करावा लागतोय. अनेक देशांनी भारताला मदतही पाठवली आहे.
देशात करोना संसर्गावर शास्त्रज्ञांचा एक सल्लागार गट नेमण्यात आला आहे. या गटाचे प्रमुख एम. विद्यासागर हे आहेत. पुढील आठवड्यात देशात करोनाचा संसर्ग टिपेला पोहोचू शकतो, असा आमचा अंदाज असल्याचं विद्यासागर म्हणाले. यापूर्वी याच गटाने देशात करोनाचा संसर्ग ५ ते १० मे दरम्यान टिपेला (पिक) जाईल, असा अंदाज व्यक्त केला होता.
देशात जुलै आणि ऑगस्टदरम्यान करोनाचा संसर्ग टिपेला जाईल, असा अंदाज काही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या अंदाजांबाबत आम्ही गंभीर नाही. कारण तोपर्यंत देशातील संसर्गाची लाट ओसरलेली असेल. पण पूर्वीसारखे करोनाचे कमी रुग्ण आढळून येत राहतील आणि स्थिती नियंत्रणात असेल, असं विद्यासागर म्हणाले.
आपल्याला या लाटेच्या परिणामांचा सामना येत्या ४ ते ६ आठवड्यांपर्यंत करावा लागू शकतो. यादरम्यान करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात येतील. पण आपण काळजी घेतल्यास ही संख्या दिवसेंदिवस कमी होईल. यामुळे या संकटाचा सामना करण्यासाठी दीर्घकाली उपाययोजनांची रुपरेषा आखण्याची गरज नाही. करोनापासून बचासाठी आपल्याला जे काही करायचं आहे ते आताच करावं लागेल. करोनाच्या संसर्गापासून वाचण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःला सुरक्षित ठेवा, असं विद्यासागर यांनी सांगितलं.
देशात करोना संसर्गाची पहिली लाट सप्टेंबर २०२० मध्ये आली होती. त्यावेळी देशात ९७,८९४ इतके सर्वाधिक नवीन रुग्ण आढळून आले होते. सध्याच्या लाटेत गेल्या १० दिवसांपासून सर्वाधिक रुग्णांची संख्या ही त्याच्या तीन पटीहून अधिक आहे. यामुळे गणिताच्या अंदाजानुसार संसर्ग टिपेला पोहण्याचा काळ फार दूर नाही. तसंच बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही या अंदाजाला बळ देत आहे. यामुळे परिस्थिती सामान्य होण्यास फार काळ लागणार नाही, असं बोललं जातंय.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times