करोना संसर्ग नियंत्रणात रहावा यासाठी मुंबईसह राज्यामध्ये विविध पातळ्यांवर कडक निर्बंध लावण्यात आले असले तरीही मुंबईच्या विविध प्रभागांमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. तसंच, लसीचा साठा अपुरा असल्यानं लसीकरण मोहिमही खोळंबली आहे. याबाबत आज किशोरी पेडणेकर यांनी भाष्य केलं आहे.
किशोरी पेडणेकर यांनी मुंबईकरांना मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे. त्या म्हणाल्या की, ‘मी प्रत्येकाला हात जोडून विनंती करते की, मास्क वापरा. दोन मास्क वापरावेत, लोकांनी कोणतंही कारण नसताना घराबाहेर जाणं टाळावं,’ अशी माझी विनंती करत महापौरांनी मुंबईकरांना हात जोडून आवाहन केलं आहे.
लसीकरण मोहिमेबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ‘४५ ते ६० वयोगटातील जे लोक दुसऱ्या डोससाठी येतील, त्यांना प्राधान्य दिलं जाईल. लसीकरणासाठी नोंदणी केल्यानंतर आणि मेसेज आल्यानंतर १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना लस दिली जाईल. ज्या प्रमाणं लस उपलब्ध होईल, त्या प्रमाणे पुन्हा लसीकरण केंद्र सुरु राहिल,’ असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
तसंच, ‘ज्यांनी कोविन अॅपवर नोंदणी केली आहे त्यांना मेसेज आलाय. त्यांनी लसीकरण केंद्रावर जावं. पण, जोपर्यंत मेसेज येत नाही, तोपर्यंत नागरिकांनी लसीकरण केंद्रावर जाऊ नये. जर तुम्ही नोंदणी केली आहे. पण मेसेज आलेला नाही. अशा नागरिकांनीही लसीकरण केंद्रावर जाऊ नये,’ असंही किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times