यासंदर्भात नाशिकरोड भाजप मंडळ अध्यक्ष हेमंत गायकवाड यांनी शनिवारी पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीनुसार विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस,
नाशिक जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार गिरीश महाजन, आमदार जयकुमार रावल, खासदार डॉ भारती पवार, आमदार सीमा हिरे, राहुल ढिकले,महापौर सतीश कुलकर्णी आदी शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता पालिकेच्या नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयाच्या दौऱ्यावर आले होते.
याप्रसंगी अज्ञात इसमांनी फडणवीस यांना उद्देशून आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केला आणि हा व्हिडीओ फेसबुकवर प्रसारित करून राजकीय तेढ निर्माण करण्यासह फडणवीस यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. रतन खालकर, संकेत भोसले, प्रमोद कोहंकडे, राहुल जोशी आणि बंटी ठाकरे या पाच जणांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंट वरून हा व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आल्याने या पाच जणांविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘मी शहरात राहिलो असतो तर तुम्हाला बघून घेतले असते.’ अशा शब्दांत संकेत भोसले याने गिरीश महाजन यांना उद्देशून स्वतःच्या फेसबुक अकाऊंटवरून हा आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसारित केला. त्यात फडणवीस यांनाही मारण्याची धमकी दिल्याचे गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. फडणवीस, महाजन या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांविषयी शिवराळ भाषेतील आणि बदनामी करणारा व्हिडीओ प्रसारित केल्याचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर भाजपच्या पदाधिका-यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकांची भेट घेत त्यांच्याकडे तक्रार दिली आणि संशयितांवर कठोर कारवाईची मागणी केली. या अदखलपात्र गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास शेळके करीत आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times