मुंबईः पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत अटीतटीच्या लढतीत भाजपचे उमेदवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमदेवार भगीरथ भालके यांना ३ हजार ७३३ मतांनी पराभूत केले आहे. पंढरपूर निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. समाधान अवताडे यांच्या विजयानंतर भाजपचे नेते व विरोधी पक्षनेते यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. तसंच, महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

पंढरपूर पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी ही जागा भाजपला द्या, या सरकारचा करेक्ट कार्यक्रम करतो, असं विधान केलं होतं. देवेंद्र फडणवीसांच्या या विधानानंतर राज्यात ऑपरेशन लोटसचे संकेत देण्यात आले होतं. आज पोटनिवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एकदा यावरुन फडणवीसांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, ‘अवताडेंना निवडून द्या योग्य वेळी सरकारचा करेक्ट कार्यक्रम करतो, असं माझ् वक्तव्य होतं. योग्य वेळ येईल तेव्हा करेक्ट कार्यक्रम होणारच आहे. पण आता लढाई ही करोनाची आहे. आमचं लक्ष हे करोनाच्या लढाईच्या पाठिशी आहे,’ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

‘महाराष्ट्रातील करेक्ट कार्यक्रम योग्य वेळी होईल. करोनाच्या काळात सरकारला आम्ही साथ देतोय. त्यामुळं आज ही चर्चा मी करत नाही. पण काय घडलं ते योग्य वेळी तुम्हाला कळेलंच,’ असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

‘पश्चिम बंगालच्या जनतेबरोबर महाराष्ट्राची जनता जिगरबाज आहे. म्हणून भाजपसोबत तुम्हाला निवडणून दिलं होतं. पण तुम्ही त्यांच्यासोबत विश्वासघात केला आणि त्या जिगबाज असलेल्या महाराष्ट्राच्या जनतेला निवडून न दिलेले सरकार दिलं,’ असा टोला फडणवीस यांनी यावेळी शिवसेनेला लगावला आहे.

‘गेल्या दीड वर्षात महाविकास आघाडीच्या भोंगळ कारभाराला आरसा दाखवण्याचे काम पंढरपूरच्या जनतेनं केलंय. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतरची ही पहिलीच निवडणुक आहेत. या निवडणुकीत ज्या प्रकारे तिन्ही पक्ष उतरले. साम, दाम दंड भेद असे सगळे प्रकार वापरले, मोठ्या प्रमाणात पैशाचा दुरुपयोग केला, प्रशासनाचा गैरउपयोग केला. हे सगळं केल्यानंतर देखील भाजपला लोकांनी निवडून दिलं आहे,’ असं म्हणत फडणवीस यांनी विजयाबद्दल प्रतिक्रिया केली आहे.

महाविकास आघाडीचे नेते म्हणजे बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना

‘पश्चिम बंगालमध्ये आमच्या अपेक्षेनुसार जागा आल्या नसल्या तरी ३ जागांवरुन आम्ही मारलेली मजल ही देखील मोठी गोष्ट आहे. बंगाल हा कम्युनिस्ट व काँग्रेसमुक्त झाला असून बंगालमध्ये आता भगव्यांचा बोलबाला सुरु झाला आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी बंगालच्या निकालावर दिली आहे. तसंच, बंगालच्या निकालानंतर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया बघून ‘बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना’ ही म्हण आज मी बघतोय. संजय राऊत यांच्यासह सर्वच महाविकास आघाडीचे नेते बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना सारखे वागत आहेत,’ असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here