मुंबईः पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडे यांचा विजय झाला आहे. भाजपचा विजय महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेससाठी धक्का मानला जातो. विशेष करून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. पंढरपुर- मंगळवेढा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव का झाला याचं कारण जयंत पाटील यांनी दिलं आहे.

भाजपचे समाधान अवताडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके यांच्यात येथे थेट लढत झाली होती. समाधान आवताडे यांना १ लाख ७ हजार ७७४ मते तर भगीरथ भालके यांना १ लाख ४ हजार २७१ मते मिळाली. या अटीतटीच्या लढतीत आवताडे यांनी ३ हजार ५०३ मतांनी हा विजय मिळवला आहे. यानंतर पंढरपूर – मंगळवेढा पोटनिवडणुकीत आमचा थोडक्यात पराभव झाल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.

‘राष्ट्रवादी काँग्रेसने केरळ येथे तीन तर महाराष्ट्र येथे एका जागेवर निवडणूक लढवली होती. आज झालेल्या मतमोजणीत केरळमध्ये दोन ठिकाणी यशस्वी ठरलो मात्र महाराष्ट्रातील पंढरपूर – मंगळवेढा पोटनिवडणुकीत आम्ही अपयशी ठरलो,’ अशी कबुलीही जयंत पाटील यांनी दिली आहे.

‘महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांनी चांगली मदत केली, मात्र दोन तालुक्यात संवाद साधता न आल्याने आणि दोन तालुक्‍यातील सर्वांना सोबत घेऊन जाण्यात आम्हाला अपयश आल्याने आमचा त्या ठिकाणी थोडक्यात पराभव झाला, असेही जयंत पाटील म्हणाले. या निवडणुकीसाठी अनेक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली होती. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे यावेळी जयंत पाटील यांनी आभार मानले आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here