पंढरपूर: पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या यांनी विजय मिळाला. राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची केलेली ही हक्काची जागा अवताडे यांनी खेचून आणली. मात्र या आनंदाच्या दिवशी दुग्धशर्करा योग जुळून आल्याने त्यांचा हा विजय खास बनला आहे. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असून याच दिवशी त्यांना अतिशय चुरशीच्या निवडणुकीत आमदारकी मिळाली. या विजयात आपल्या गृहलक्ष्मीच्या शुभेच्छा असल्याचे समाधान आवताडे सांगतात. या विजयानंतर लगेच उद्यापासून मंगळवेढा येथील पाणी प्रश्न हाती घेत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे अवताडे यांनी सांगितले.

सार्‍या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या पंढरपुर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे समाधान आवताडे हे ३ हजार ७३३ मतांनी विजयी झाले असून राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांचा येथे पराभव झाला आहे. पंढरपूर मतदारसंघात प्रथमच भाजपाने विजय मिळवला आहे. अर्धे मंत्रिमंडळ प्रचारात उतारावणाऱ्या अजित पवार यांच्यासाठी हा पराभव धक्का मानला जात आहे. पंढरपूर शहर व परिसरातील गावांनी या निवडणुकीत अवताडे यांना साथ दिली असून यासाठी आमदार प्रशांत परिचारक व त्यांचे बंधू उमेश यांनी जोरदार व्यूहरचना आखली होती. यामुळे भागातून चांगली मतं भाजपाला मिळाली आहेत.

आज सकाळी आठ वाजता येथील शसकीय गोदामात मतमोजणीस सुरूवात झाली होती. पहिल्या फेरीत भाजपाचे समाधान आवताडे यांनी ३५० मतांची आघाडी घेतली होती. मात्र, नंतर राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांनी पुढील सहा फेर्‍यात मताधिक्क्य मिळवले होते. पंढरपूर शहरातील मतमोजणीत पुन्हा भाजपाच्या आवताडेंनी घेतलेली आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम ठेवत अतिशय रोमहर्षक विजय मिळविला. या मतमोजणीत कोणालाही मोठी आघाडी शेवटपर्यंत घेता आली नाही. पंढरपूर शहर व जोडलेल्या २२ गावांमधून समाधान आवताडे यांना ९०० मतांचे मताधिक्क्य मिळाले. येथील परिचारक गटाने केलेल्या प्रामाणिक प्रचारामुळे अवताडे यांना पंढरपूर भागात चांगली मतं मिळाली.

या विजयात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सहा सभांचा झंझावात आणि गोपीचंद पडळकर यांचा मंगळवेढा भागातील प्रचार याचा मोठा सहभाग आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादीचे उमेदवार सोडले तर इतर सर्व उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. या पोटनिवडणुकीत एकूण २ लाख २७ हजार ४२१ मतं मोजण्यात आली असून यात ३३३१ टपाली मतांचा समावेश होता. यापैकी समाधान आवताडे यांना १ लाख ९ हजार ४५० तर राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना १ लाख ५ हजार ७१७ मतं मिळाली आहेत. टपाली मतमोजणी ही ३६ व्या फेरीनंतर घेण्यात आली. यात आवताडे यांना १६७६ तर भालके यांना १४४६ मते मिळाली. अपक्ष शैला गोडसे यांना २५ तर सिध्देश्‍वर आवताडे यांना २५ टपाली मतं मिळाली.

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली होत. ही जागा २००९ पासून सलग तीन वेळा भारत भालके यांनी जिंकली होती. पोटनिवडणुकीत त्यांचे चिरंजीव भगीरथ यांना पक्षाने उमेदवारी दिली. मात्र त्यांचा येथे पराभव झाला. दरम्यान विजयी झालेले भाजपाचे समाधान आवताडे हे २०१४ पासून या मतदारसंघात नशीब आजमावत आहेत. त्यांना तिसर्‍या निवडणुकीत विजय मिळविता आला आहे. २०१४ व २०१९ च्या मतांचा विचार केला तर अवताडेंची मते वाढत असल्याचे दिसत होते. या निवडणुकीत भाजपाने पंढरपूरच्या आमदार प्रशांत परिचारक यांची ताकद अवताडेंच्या पाठीशी लावली होती. ही व्यूहरचना यशस्वी ठरली व पहिल्यांदाच या मतदारसंघात भाजपाला यश मिळविता आले आहे.

ही जागा जिंकण्यासाठी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीने खूप प्रयत्न केले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जागा प्रतिष्ठेची केली होती. तर भाजपाने ही तीन पक्षांच्या आघाडीला रोखण्यासाठी सारी ताकद पणाला लावली व यात त्यांना यश आल्याचे दिसत आहे. सार्‍या राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे होते. या निवडणुकीत पंढरपूरच्या परिचारक गटाने आवताडे यांच्या विजयासाठी खूप प्रयत्न केल्याचे दिसत होते. ही लढत आमदार प्रशांत परिचारक यांनी प्रतिष्ठेची केली होती. यात त्यांना यश आले आहे. या निवडणुकीची जबाबदारी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर देण्यावर आली होती.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here