अहमदाबाद : पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यात एक विचित्र गोष्ट पाहायला मिळाली. या सामन्यात पंजाबचे दोन्ही फलंदाज एकाच बाजूला धावत असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आता कोणता फलंदाज बाद झाला आहे, हा मोठा प्रश्न पंचांना पडला होता.

नेमकं घडलं तरी काय…ही गोष्ट १४व्या षटकात पाहायला मिळाली. हे १४वे षटक दिल्लीचा फिरकीपटू अक्षर पटेल टाकत होता. या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर मयांक अगरवालने कव्हर्सच्या दिशेने फटका लगावला आणि तो धाव घेण्यासाठी धावत सुटला. सुरुवातीला ही धाव घ्यायची नाही, असे दीपक हुडाने ठरवले होते. त्यामुळे त्याने धाव घेण्यात तत्परता दाखवली नाही. पण त्यानंतर मात्र ही धाव घ्यायला हवी, असे हुडाला वाटले.

तोपर्यंत चेंडू हा शिमरॉन हेटमायरपर्यंत पोहोचला होता. हेटमायरने हा चेंडू पकडला आणि गोलंदाजाच्या दिशेने टाकला. अक्षर पटेलनेही यावेळी तत्परता दाखवली आणि फलंदाजाला धावचीत केले. पण त्यावेळी फलंदाज धावचीत झाला आहे की नाही, याबाबत अक्षरला स्पष्टता नव्हती. त्यावेळी दोन्ही फलंदाज हे गोलंदाजाच्या दिशेला होते. त्यामुळे अक्षरने यावेळी तो चेंडू यष्टीरक्षक-कर्णधार रिषभ पंतच्या दिशेने टाकला आणि त्यानेही स्टम्स उडवले. यावेळी दोन्ही फलंदाज गोलंदाजाच्या दिशेला होते आणि त्यांच्यामधला नेमका कोणता फलंदाज बाद झाला आहे, हे पंचांना समजले नाही. त्यामुळे हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे देण्यात आला.

तिसऱ्या पंचांनी यावेळी अक्षर पटेलने केलेला रनआऊट पहिला पाहिला. अक्षरने यावेळी जेव्हा चेंडू स्टम्पला लावला होता त्यावेळी एकही फलंदाज क्रीझमध्ये नव्हता. पण त्यावेळी नेमक्या कोणत्या फलंदाजाला बाद द्यायचे हा निर्णय तिसऱ्या पंचांना द्यायचा होता. त्यावेळी जेव्हा रनआऊट करण्यात आल त्यावेळी गोलंदाजाच्या बाजूला दीपक हुडाची बॅट कर्णधार मयांक अगरवालच्या पहिली होती. त्यामुळे तिसऱ्या पंचांनी यावेळी हुडाला रनआऊट देण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला आपण रनआऊट आहोत, असे मयांकला वाटत होते. त्यामुळे तो पेव्हेलियनच्या दिशेने जात होता. पण तिसऱ्या पंचांनी योग्य निर्णय दिला आणि हुडाला बाद घोषित करण्यात आले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here